मारिनवरील विजयासह आव्हान कायम
भारताच्या सायना नेहवालने गुरुवारी झालेल्या लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनवर २३-२१, ९-२१, २१-१२ असा सनसनाटी विजय मिळवत बीडब्लूएफ सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान कायम राखले. सुमारे सव्वा तास रंगलेल्या या सामन्यात सायनाने सुरुवातीच्या चुका सुधारत मारिनवर वर्चस्व गाजवले आणि स्पध्रेतील पहिल्या विजयाची नोंद केली. या विजयाबरोबर सायना आणि मारिन यांच्यातील जय-पराजयातील आकडेवारी ४-२ अशी झाली आहे. दुसरीकडे सलग दुसऱ्या लढतीत पराभव पत्करावा लागल्याने भारताच्या किदम्बी श्रीकांतचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात येण्याचे चिन्ह आहे. डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनन श्रीकांतवर २१-१३, २१-१८ असा विजय मिळवला.
पहिल्याच लढतीत अवघ्या अध्र्या तासात पराभव पत्करणाऱ्या सायनाने कट्टर प्रतिस्पर्धी मारिनला सडेतोड उत्तर दिले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मारिनला दुबईच्या हॅमडॅन क्रीडा संकुलात मिळत असलेला पाठिंबा सायनावर दडपण आणण्यासाठी पुरेसा होता. मात्र सायनाने त्याकडे दुर्लक्ष करून भेदक स्मॅश आणि नेटजवळ खेळ केला. पहिल्या गेममध्ये मारिनने गुणखाते उघडले. मात्र सायनाने ९-३ अशी आघाडी घेतली. मारिनही हार मानणाऱ्यातली नव्हती, तिनेही अप्रतिम खेळ करताना सलग सहा गुणांची कमाई करून ९-९ अशी बरोबरी मिळवली. त्यानंतर प्रत्येक गुणासाठी या अव्वल दर्जाच्या खेळाडूंमध्ये सुरू असलेली चुरस प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी होती. अखेरीस सायनाने पहिला गेम
२३-२१ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मारिनने आक्रमक खेळ करत १२-७, १९-९ अशी आघाडी घेत विजयाचा मार्ग सोपा केला. मारिनने हा गेम २१-९ असा जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्ये अपेक्षित चुरस पाहायला मिळाली नाही. सायनाने हा गेम २१-१२ असा सहज जिंकत स्पध्रेतील आव्हान कायम राखले.