पाच माजी विजेत्या संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला असून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फे रीत लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.

चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले असून रेयाल माद्रिद, युव्हेंटस, बार्सिलोना, चेल्सी आणि बायर्न म्युनिक हे एकाच गटात आहेत. दुसऱ्या गटत तीन वेळा अंतिम फेरी गाठणारा अ‍ॅटलेटिको माद्रिद, पॅरिस सेंट-जर्मेन, अ‍ॅटलांटा आणि लेपझिग या संघांचा समावेश आहे. उपांत्यपूर्व फेरीचे  सामने १२ ते १५ ऑगस्टदरम्यान पोर्तुगाल येथे तर उपांत्य फे रीचे सामने १७ आणि १८ ऑगस्ट रोजी खेळवण्यात येईल. विजेतेपदासाठीची लढत लिस्बन येथे २३ ऑगस्ट रोजी रंगणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीचे संघ अद्याप निश्चित झाले नसले तरी युव्हेंटस आणि लिऑन यांच्यातील विजेत्याची गाठ उपांत्यपूर्व फेरीत रेयाल माद्रिद किंवा मँचेस्टर सिटी यांच्यापैकी एकाशी पडणार आहे. बार्सिलोना आणि नापोली यांच्यातील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीत बायर्न म्युनिक आणि चेल्सी यांच्यापैकी एकाशी दोन हात करेल.

दुसऱ्या गटाचे उपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट असून लेपझिगची गाठ अ‍ॅटलेटिको माद्रिदशी तर अटलांटाचा सामना पॅरिस सेंट जर्मेनशी होईल. यांच्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत एकमेकांशी भिडेल.