काई होवित्झच्या एकमात्र गोलमुळे चेल्सीने मँचेस्टर सिटीला १-० ने हरवले आणि नऊ वर्षांत दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले. शनिवारी रात्री सुमारे १४,११० प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात होवित्झने ४२व्या मिनिटाला चेल्सीसाठी एकमेव विजयी गोल केला. मेसन माउंटच्या पासवर त्याने हा गोल केला. या पराभवानंतर मँचेस्टर सिटीच्या संघाला सलग दुसऱ्या विजेतेपदाने हुलकावणी दिली.

 

 

हेही वाचा – चुकीला माफी नाही! अंपायरविरुद्ध वापरली अपमानास्पद भाषा, मग ICCनं ठोठावला मोठा दंड

मागील सहा आठवड्यांमधील मॅनचेस्टर सिटीविरुद्ध चेल्सीचा हा तिसरा विजय आहे. करोना साथीच्या आजारामुळे चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना तुर्कीची राजधानी इस्तंबूल येथून पोर्तो येथे हलविण्यात आला. मॅनेजर थॉमस तुशेल यांच्या मार्गदर्शनाखाली चेल्सीच्या हस्ते लीग कप आणि एफए कपमध्ये मँचेस्टर सिटीचा पराभव झाला होता. मागील हंगामात पॅरिस सेंट जर्मेनकडून चेल्सीचा संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता.

“मला काय बोलावे हे खरोखर माहित नाही. मी खूप काळापासून ही संधी शोधत होतो,” असे विजयी गोल नोंदवणाऱ्या होवित्झने सांगितले. याआधी, चेल्सीने २०१२मध्ये चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले होते. मँचेस्टर सिटीला अंतिम सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु चेल्सीने त्यांना पराभूत केले. मँचेस्टर सिटीने नुकतेच प्रीमियर लीग चॅम्पियनशिपवर नाव कोरले आहे.

या विजेतेपदासह चेल्सी हा दोनदा चॅम्पियन्स लीग विजेतेपद जिंकणारा इंग्लंडचा तिसरा संघ ठरला. लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेडने यापूर्वी दोन वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळविले आहे.