तुफानी फलंदाजी हे संघनायक महेंद्रसिंग धोनीचे वैशिष्टय़. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मोसमातही धोनीचा हा धडाका कायम आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुणतालिकेत प्रारंभापासून आघाडीच्या संघांमध्ये स्थान कायम राखले आहे. चेन्नईचा संघ त्यांचे हे विजयी अभियान कायम राखण्याच्या इराद्यानेच गुरुवारी ईडन गार्डन्स मैदानात उतरणार असल्याने कोलकाता नाइट रायडर्स संघाला घरच्या मैदानावर विजय मिळवणे, हे मोठे आव्हान ठरणार आहे.

धोनीने मागील तीन सामन्यांमध्ये त्याचा प्रभाव दाखवताना दोन अर्धशतकांची नोंद केली आहे. त्याशिवाय शेन वॉटसननेदेखील त्याचे अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे चेन्नईने ६ सामन्यांमधील विजयासह १२ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. चेन्नई आणि कोलकाता या दोन्ही संघांनी मागील सामन्यात आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये वॉटसनने एक शतक आणि एका अर्धशतकासह गोलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे. याचप्रमाणे बेंगळूरुवर मात करणारी धोनीची ३४ चेंडूंमधील ७० धावांची खेळी ही २०११च्या विश्वचषकातील विजयी खेळीची आठवण करून देणारी ठरली आहे. चेन्नईचे कोलकाताविरुद्ध १२-७ असे विजय-पराभवाचे समीकरण असून सध्या तरी चेन्नईला विजयाची अधिक संधी आहे.

दुसरीकडे आता केवळ सहा सामने शिल्लक राहिल्याने कोलकाता संघाला हा सामना गमावून चालणार नाही. त्यांचे यश हे प्रामुख्याने ख्रिस लीन, आंद्रे रसेल आणि सुनील नरिन या विदेशी खेळाडूंच्या कामगिरीवरच प्रामुख्याने अवलंबून आहे. कर्णधार दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, शुभमान गिल यांना अधिक चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.