इंग्लंडमध्ये यंदाची विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघ आपल्या खेळाडूंची चाचपणी करत आहे. टीम इंडियामध्ये सध्या प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी कोणते १५ खेळाडू निवडले जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तशातच टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी ऋषभ पंत, विजय शंकर आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू शर्यतीत असल्याचे सांगितले आहे.

‘ऋषभ पंतचा एकदिवसीय विश्वचषकासाठी विचार केला जात आहे. गेल्या एका वर्षात त्याने प्रचंड मेहनत घेतली असून अतिशय चांगली कामगिरी केली आहे. तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. फक्त त्याला खेळात अजून परिपक्व होण्याची गरज आहे. म्हणूनच त्याला भारत अ संघात शक्य तितकी संधी देण्यात आली होती’, असे प्रसाद म्हणाले.

विजय शंकरबाबत बोलताना ते म्हणाले की कोहलीच्या अनुपस्थितीत विजय शंकर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. त्याने केवळ गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजीतही चांगली कामगिरी बजावली. वेळ प्रसंगी त्याने फटकेबाजी करून भारताच्या डावाला गती दिली. त्यामुळे चौथा अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय निवड समिती त्याचा विचार करत आहे.

‘गेल्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत लोकेश राहुलचा सलामीवीर म्हणून संघात विचार सुरु होता. मात्र त्याने सातत्याने अत्यंत खराब कामगिरी केल्यामुळे आता अजिंक्य रहाणेचा या स्थानासाठी विचार सुरु आहे. अजिंक्यने बराच काळापासून टीम इंडियाकडून एकदिवसीय सामना खेळ नसला, तरी भारत अ संघाकडून त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सलामीच्या स्थानासाठी तो या शर्यतीत नक्कीच असेल, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

विश्वचषकासाठी सर्वप्रथम २० खेळाडूंची यादी काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्यातील सर्वोत्तम १५ खेळाडूंना विश्वचषक खेळण्याची संधी मिळणार आहे.