भारतीय कसोटी संघाचा हक्काचा खेळाडू चेतेश्वर पुजारा गेले काही दिवस चांगल्याच चर्चेत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला कसोटी मालिका जिंकवून देण्यामध्ये पुजाराने मोलाचा वाटा उचललेला होता. 4 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 ने बाजी मारल्यानंतर पुजाराचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं. भारतीय संघ वन-डे मालिका खेळायला लागल्यानंतर, मायदेशी परतलेल्या पुजाराने आराम न करता रणजी क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्राकडून उपांत्य फेरीच्या सामन्यात उतरण्याचं ठरवलं. कर्नाटकविरुद्ध सामन्यातही पुजाराचा हा फॉर्म कायम राहिला, मात्र एका प्रसंगामुळे पुजाराला कर्नाटकच्या प्रेक्षकांचा रोष पत्करावा लागला. सामन्यादरम्यान मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी पुजाराची चिटर, चिटर…म्हणून हेटाळणी केली.

पहिल्या डावात कर्नाटकने 275 धावा केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल सौराष्ट्राने 239 धावांपर्यंत मजल मारली. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला चेतेश्वर पुजारा बाद असल्याचं अपील करण्यात आलं होतं, मात्र पंचांनी ते मान्य केलं नाही. मात्र उपस्थित चाहत्यांच्या मते चेंडू पुजाराच्या बॅटची कड घेऊन झेल घेतला होता. पुजाराला ही गोष्ट माहिती असुनही त्याने मैदान सोडलं नाही. यानंतर उपस्थित चाहत्यांनी पुजाराची चिटर, चिटर…म्हणून हेटाळणी करण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या डावातही पुजारा फलंदाजीसाठी आलेला असताना काहीसा असाच प्रसंग पहायला मिळाला. 29 धावसंख्येवर फलंदाजी करत असताना विनय कुमार आणि पुजारात काहीसं द्वंद्व रंगलेलं पहायला मिळालं. मात्र यानंतरही पुजाराने शतक झळकावत आपली कामगिरी चोख बजावली.