मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे श्रमिक जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगारमहर्षी गं. द. आंबेकर क्रीडा महोत्सवात प्रथम श्रेणी व्यावसायिक गटात चिनू स्पोर्ट्स क्लब, महिलांमध्ये शिवशक्ती महिला संघ आणि पुरुषांच्या ‘ब’ गटात नवोदित संघाने विजेतेपद पटकावले.

व्यावसायिक गटात चिनू स्पोर्ट्स क्लबने खामकर संघाचा ३१-२० असा पराभव केला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक चिनू स्पोर्ट्स क्लबच्या हर्ष जाधवने मिळवले, तर अजिंक्य पाटील (खामकर) आणि सुरेंद्र खेडेकर (चिनू) अनुक्रमे सर्वोत्तम पकडपटू आणि सर्वोत्तम चढाईपटू ठरले.

महिलांमध्ये शिवशक्तीने अमरहिंद स्पोर्ट्स क्लबला ४२-२१ असे नामोहरम केले. शिवशक्तीचा पूजा यादव स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरली. तेजस्विनी पोटेने (अमरहिंद) सर्वोत्तम पकडीचे तर ऋतुजा बांदिवडेकरने (शिवशक्ती) सर्वोत्तम चढाईपटूचे बक्षीस मिळवले.

पुरुष गटात नवोदित संघाने सक्षम संघावर २८-२५ असा विजय मिळवला. सक्षम संघाचा सुदेश गुडेकर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला, तर नवोदित संघाचे अनेय शिंदे आणि सुमित तावडे अनुक्रमे उत्कृष्ट चढाईपटू आणि उत्कृष्ट पकडपटू ठरले. पारितोषिक वितरणप्रसंरगी अर्जुन पुरस्कार विजेते सदानंद शेटय़े, राष्ट्रीय कबड्डीपटू जीवन पैलकर आणि मीनानाथ धानजी उपस्थित होते.