नवी दिल्ली : कारकीर्दीतील पाचवी आणि अखेरची विश्वचषक स्पर्धा खेळणारा वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने तंदुरुस्त राहण्यावर भर दिला आहे. इंग्लंडमध्ये ३० मेपासून रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत आपली तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी गेल सध्या गेल्या दोन महिन्यांपासून जिममध्ये घाम गाळत आहे.

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये गेलने ४०.८३च्या सरासरीने ४९० धावा फटकावल्या होत्या. विश्वचषकातही त्याच लयीत खेळण्याचा त्याचा मानस आहे. ‘‘विश्वचषक स्पर्धेत माझा धावांचा आलेख नेहमीच उंचावतो. विश्वचषकात कशी फलंदाजी करायची, याचा मला चांगलाच अनुभव आहे. मी सध्या ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, त्यावर मी समाधानी असून यापुढेही दमदार खेळी करण्याचा प्रयत्न करणार आहे,’’ असे गेलने सांगितले.

वाढत्या वयाबद्दल गेल म्हणाला, ‘‘वय वाढत असताना मी मानसिकदृष्टय़ा कणखर बनण्याचा प्रयत्न करत आहे. शारीरिकदृष्टय़ा माझ्या हालचाली काहीशा मंदावल्या असतील, पण गेल्या काही महिन्यांपासून मी त्यावरही लक्ष देत आहे. मी माझा अनुभव आणि मानसिक कणखरतेचा वापर करणार आहे.’’ मी फक्त माझ्या चाहत्यांना आनंदी ठेवण्यासाठी खेळत आहे, असेही गेलने सांगितले.