दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ याचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण अगदी मजेशीर आहे. या व्हिडीओत स्मिथचा मुलगा कार्टर आपल्या बाबांना पत्रकार परिषद थांबवून एक मदत करायला सांगतो आहे. व्हिडीओतील कार्टरचे चेहऱ्यावरील भाव आणि त्यानंतर स्मिथने केलेली कृती यामुळे सध्या हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

ग्रॅम स्मिथ व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे एका पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. आफ्रिकेचा संघ खूप वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि टी-२० मालिका खेळण्यात येणार आहे. या संदर्भात ग्रॅम स्मिथ पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होता. त्याचवेळी स्मिथचा मुलगा कार्टर हातात बॅट आणि बूट घेऊन आला.

व्हिडीओद्वारे बाबा कोणाशी तरी बोलत असल्याचं कार्टरला समजलं. त्यामुळे त्याने हळूच बूट पायात घातला आणि स्मिथच्या जवळ येऊन दबक्या आवाजात म्हणाला, “बाबा, बुटाची लेस बांधून द्या ना…” कार्टरचा हा निरागसपणा पाहून सारेच चाहते अतिशय आनंदी झाले. स्मिथनेदेखील दोन मिनिटं वेळ मागून मुलाच्या बुटाची लेस बांधून दिली आणि त्याला खेळायला पाठवलं.

घडलेला प्रकार पाहून प्रश्न विचारणारा पत्रकारदेखील दोन मिनिटं थांबला. घरातलं बापाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल पत्रकारानेही स्मिथचं हसतहसत अभिनंदन केलं आणि पुढे पत्रकार परिषद सुरू झाली.