अर्जुन पुरस्कार विजेते पॅरा बॅटमिंटन खेळाडू रमेश टीकाराम यांचे गुरूवारी एका खासगी रूग्णालयात करोनामुळे निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. रमेश टीकाराम यांना करोना व्हायरसची लागण झाल्यानंतर दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर गुरूवारी दुपारी त्यांची करोनाशी झुंज अपयशी ठरली. पॅरा बॅडमिंटन असोशिएन ऑफ इंडियाने ही माहिती दिली. रमेश टीकाराम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

रमेश यांच्या निधनावर क्रीडा विश्वातील नामवंत व्यक्तिंनी शोक व्यक्त केला. याशिवाय केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली. रमेश टीकाराम यांच्या निधनाचे वृत्त समजले. मी या बातमीने खूप दु:खी झालो आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. रमेश टीकाराम यांना २००२ साली अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होतेय. देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणारे रमेश टीकाराम हे करोनाशी दोन हात करण्यात अपयशी ठरले याचे वाईट वाटते, असे ट्विट रिजीजू यांनी केले.

बॅडमिंटनकडे लक्ष केंद्रित करण्यापूर्वी टिकाराम यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. २००० मध्ये ते दिव्यांग बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया चे संस्थापक सचिव झाले. कालांतराने या संघटनेचे नाव बदलून पॅरा बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणून करण्यात आले. १९९२मध्ये बार्सिलोना पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी टीकाराम यांची निवड झाली होती. अ‍ॅथलीट म्हणून त्यांनी गोळाफेक आणि भालाफेकमध्ये अनेक पदके पटकावली. १९९५मध्ये नॉटिंघॅम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली होती. आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी एकूण १९ सुवर्ण, १० रौप्य आणि ८ कांस्यपदके जिंकली.