नेमबाजी विश्वचषक स्पर्धा लांबणीवर, खेळाडूंच्या ऑलिम्पिक तयारीवर परिणाम

नवी दिल्ली : जगभर पसरत चाललेल्या करोना विषाणूचा फटका आता भारतीय क्रीडाक्षेत्रालाही बसला आहे. नवी दिल्लीत पुढील आठवडय़ापासून सुरू होणारी नेमबाजी विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या ऑलिम्पिक तयारीवरही त्याचा परिणाम होणार आहे.

नवी दिल्लीतील नेमबाजी विश्वचषकासह टोक्यो येथे होणारी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या (आयएसएसएफ) मान्यताने १५ ते २५ मार्चदरम्यान राजधानी दिल्लीतील डॉ. कर्नी सिंग शूटिंग रेंजवर विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता ही स्पर्धा टोक्यो ऑलिम्पिकआधी दोन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे.

‘‘विश्वचषक स्पर्धा दोन टप्प्यांत घेतली जाणार असून रायफल आणि पिस्तूल प्रकाराची स्पर्धा ५ ते १२ मेदरम्यान तर शॉटगन प्रकारातील स्पर्धा २ ते ९ जूनदरम्यान आयोजित केली जाईल,’’ असे आयएसएसएफने पत्रकात म्हटले आहे. यजमानपद भूषवणाऱ्या भारतीय रायफल असोसिएशनने (एनआरएआय) ही स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी आयएसएसएफकडे केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या चीन, इटली, दक्षिण कोरिया, जपान आणि इराण यांसारख्या देशातील खेळाडूंना भारतात प्रवेश करण्याबाबत केंद्र सरकारने निर्बंध टाकल्यामुळे एनआरएआयला हे पाऊल उचलावे लागले आहे. जवळपास २२ देशांनी नेमबाजी विश्वचषकातून माघार घेतली होती, असेही एनआरएआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

अनेक स्पर्धा रद्द होत असल्या तरी इंडियन प्रीमियर क्रिकेट लीग (आयपीएल) मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच घेण्याचा संयोजकांचा मानस आहे. आयपीएलला कोणताही धोका नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले. ‘‘आयपीएल वेळेनुसारच होईल. आम्ही खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवणार आहोत. अन्य देशांतही स्पर्धा सुरू आहेत. इंग्लंड संघ श्रीलंकेत आहे तर कौंटी संघही जगभर प्रवास करत आहेत. त्यामुळे आम्ही वैद्यकीय विभागाच्या संपर्कात असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व तयारी करणार आहोत,’’ असे गांगुलीने सांगितले.

भारतीय खेळाडूंमध्ये संभ्रम

करोनामुळे अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धा रद्द कराव्या लागत असून आता टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजनावरही सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र पी. व्ही. सिंधू आणि बजरंग पुनियासारख्या अव्वल खेळाडूंनी ऑलिम्पिकचे आयोजन बिनदिक्कतपणे होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

‘‘ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा अद्याप तरी रद्द करण्यात आलेली नाही. सर्व काही सुरळीत सुरू आहे, पण करोना विषाणूचा संसर्ग जगभर फैलावत आहे. अखेरीस सरकारच्या निर्णयावर आमचा सहभाग अवलंबून आहे. ऑलिम्पिक वर्षांतच करोनाचा प्रादुर्भाव झाला असून आम्हाला वेळ पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे,’’ असे सिंधूने सांगितले.

बजरंग पूनिया म्हणाला की, ‘‘सरावासाठी भारताबाहेर जाण्याकरिता आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक देशांत प्रशिक्षणासाठी जाण्याकरिता निर्बंध लादल्यामुळे आमच्या तयारीवर परिणाम होत आहे. सरावासाठी रशियात जाण्याची आमची इच्छा आहे, पण काही कुस्तीपटू निराश आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होवो अथवा लांबणीवर पडू दे, मी माझा सराव सुरूच ठेवणार आहे.’’