कोस्टा रिका म्हणजे समुद्रकिनाऱ्यांनी समृद्ध असलेला प्रदेश. देशातल्या नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाचा खेळाच्या वाढीत महत्त्वाचा वाटा असतो. स्पेनची वसाहत म्हणून मुक्त झाल्यानंतर कोस्टा रिकाने केलेल्या प्रगतीमुळे ‘मानव विकास निर्देशांकात’ जगातल्या अव्वल देशांमध्ये त्यांचा क्रमांक आहे. साहजिकच त्यांच्या खेळातही ही प्रगती दिसून येते. ‘ला सेले’ किंवा ‘लॉस टिकॉस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोस्टा रिकाने १९२१ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. शेजारी असलेल्या इक्वेडोरचा ७-० असा धुव्वा उडवत त्यांनी दणक्यात पदार्पण केले. दक्षिण अमेरिका खंडामध्ये फुटबॉल खूप वर्षांपासूनच रुजलेला, त्यात कोस्टा रिकाची नव्याने भरती झालेली. त्यामुळे पडत-धडपडत त्यांनी वाटचाल केली.
तब्बल ६९ वर्षांनंतर १९९० साली इटलीत झालेल्या विश्वचषकात त्यांनी स्थान पटकावले. मेक्सिकोवरील बंदीचा पुरेपूर फायदा उठवत त्यांनी इटली गाठले. बोरा मिल्युटीनोव्हिक यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळताना त्यांनी स्विडन आणि स्कॉटलंडवर मात करत बाद फेरीत आगेकूच केली. मात्र झेक प्रजासत्ताकने त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. १९९४ साली अमेरिकेत तर १९९८ साली फ्रान्समध्ये झालेल्या विश्वचषकात खेळण्याचे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. मात्र खचून न जाता त्यांनी जिद्दीने २००२ विश्वचषकात स्थान मिळवले. ब्राझील आणि तुर्कस्तान अशा बलाढय़ संघांसमोर त्यांची डाळ शिजली नाही आणि प्राथमिक फेरीतूनच त्यांना परतावे लागले. झालेल्या चुकांतून सावरत त्यांनी २००६ मध्ये जर्मनीत झालेल्या विश्वचषकात प्रवेश केला, मात्र या वेळा त्यांची कामगिरी आणखीनच खालावली. ब्राझीलवारीसाठी पात्र ठरताना त्यांचा प्रवास खडतर राहिला. एल साल्व्हाडोरविरुद्ध बरोबरी आणि गयानावर विजय मिळवत त्यांनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर मेक्सिकोने त्यांना दोनदा नमवले. जोस क्युबेरोच्या एकमेव गोलच्या जोरावर त्यांनी साल्व्हाडोरला चीतपट केले आणि गयानावर ७-० असा दणदणीत विजय मिळवला. पनामाविरुद्ध २-२ बरोबरी आणि अमेरिकेविरुद्ध दोन पराभव यामुळे कोस्टा रिका पुन्हा संकटात सापडले. घरच्या मैदानावर जमैका, होन्डुरास आणि पनामावर विजय मिळवत कोस्टा रिकाने आव्हान जिवंत ठेवले. जमैकाविरुद्धची लढत बरोबरीत सोडवत कोस्टा रिकाने दोन लढती शिल्लक असतानाच विश्वचषकवारी पक्की केली. पण त्यांची ही वारी फक्त विश्वचषकात सहभागापुरतीच मर्यादित राहणार का, हा प्रश्न आहे.  
संकलन : पराग फाटक

कोस्टा रिका (ड-गट)
फिफा क्रमवारीतील स्थान : ३४

विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : ४ वेळा (२०१४ सह)
*दुसरीफेरी : १९९०

संभाव्य संघ
गोलरक्षक : केइलर नवास, पॅट्रिक पेमबर्टन, डॅनियल कॅम्ब्रोनेरो. बचावफळी : जॉनी अकॉस्टा, गिआनकार्लो गोंझालेझ, मायकेल उमाना, ऑस्कर डुराटे, वायलोन फ्रान्सिस, हेइनर मोरा, ज्युनियर डायझ, ख्रिस्तियन गामबोआ, रॉय मिलर, केंडल वॉटसन. मधलीफळी : सेल्सो बोर्गस, ख्रिस्तियन बोलानोस, ऑस्कर इस्टेबान ग्रान्डोस, मायकेल बारांटेस, येस्टिन तेजेडा, डिएगो काल्वो, जोस मिग्युएल क्युबेरो, कार्लोस हर्नाडिझ. आघाडीची फळी : अल्वारो साबोरिओ, ब्रायन रुइझ, जोएल कॅम्पबेल, रॅन्डॉल ब्रेनेस, मार्को उरेना.
*स्टार खेळाडू : केइलर नवास, ब्रायन रुइझ, अल्वारो साबोरिओ, जोएल कॅम्पबेल.
*व्यूहरचना : ३-४-३, ४-४-२ किंवा ४-२-३-१
* प्रशिक्षक : जॉर्ज लुइस पिंटो
ब्रायन रुइझ
जोएल कॅम्पबेल
बलस्थाने आणि कच्चे दुवे
आक्रमणासह प्रतिस्पध्र्याना सळो की पळो करून सोडायचे हे कोस्टा रिकाच्या खेळाचे वैशिष्टय़. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावण्यासाठी केवळ आक्रमण उत्तम असून चालत नाही याची जाणीव ठेवून कोलंबियाचे प्रशिक्षक जोरगे पिंटो यांनी संघाला सर्वसमावेशक डावपेचांची शिदोरी दिली. पारंपरिक शैलीने खेळणारा कर्णधार ब्रायन रूईस कोस्टा रिकासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. जोइल कॅम्पबेलचा युवा जोश आणि अल्वारो साबारिओचा अनुभव हे सुरेख मिश्रण प्रतिस्पध्र्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. केइलर नवासच्या रूपात कोस्टा रिकाला गोल रोखणारी अभेद्य भिंत लाभली आहे. गुणवत्ता, कौशल्य, डावपेच, अभ्यास या सगळ्या पातळ्यांवर कोस्टा रिकाचा संघ गुणी विद्यार्थी आहे परंतु गटातले अन्य तीन दमदार संघांकडे असलेला अनुभव आणि मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याची हातोटी कोस्टा रिकाच्या खेळाडूंकडे नाही.

अपेक्षित कामगिरी
कोस्टा रिकाच्या गटात उरुग्वे, इंग्लंड आणि इटली असे तीन बलाढय़ देश आहेत. त्यामुळे कोस्टा रिकाला एकाही सामन्यात गाफील राहून चालणार नाही. अन्य गटांतल्या प्रतिस्पध्र्यापैकी इटलीने सहा, उरुग्वेने दोन तर इंग्लंडने एकदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. त्यामुळे मोठय़ा व्यासपीठावर खेळण्याचा अन्य तीन संघांकडे असणारा अनुभव कोस्टा रिकाकडे नाही. मात्र क्लब तसेच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कोस्टा रिकाने सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. आपल्या खेळापेक्षाही प्रतिस्पर्धी संघाच्या कच्च्या दुव्यांचा सखोल अभ्यास त्यांना करावा लागणार आहे. घरच्या मैदानात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या कोस्टा रिकासमोर तटस्थ ठिकाणी आणि क्रीडाविश्वातल्या सर्वोच्च सोहळ्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे. दुसरीकडे कोस्टा रिकाची लिंबूटिंबूमध्ये गणना करून दुर्लक्ष करणे अन्य संघांना महागात पडू शकते.