तमाम भारतीयांच्या नव्हे जगभरातील क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं सर्वाचं लाडकं दैवत क्रिकेटमधून निवृत्त होतंय, या वृत्तानं गुरुवारी सर्वत्र खळबळ माजवली. परंतु या दैवताचं रिक्त झालेलं देऊळ एक फार मोठी पोकळी निर्माण करणार आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेटला अर्थातच प्रतीक्षा आहे ती नव्या मास्टरची.
सुनील गावस्कर हा भारतीय क्रिकेटरसिकांनी डोक्यावर घेतलेला पहिला ध्रुवतारा. ‘लिटिल मास्टर’ या टोपणनावानं ओळखला जाणारा गावस्कर मुंबईचाच. गावस्करने १९८७मध्ये निवृत्ती पत्करली. त्यानंतर फक्त दोन वर्षांनी सचिनरूपी नवा तारा उदयाला आला. देशोदेशीच्या गोलदाजांना झगडायला लावणारा, सोबतच्या फलंदाजांना प्रेरणा देणारा सचिन पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत आपल्या कारकीर्दीतील २००वा सामना खेळणार आहे. हाच सामना त्याच्या कारकीर्दीचा अखेरचा सामना असणार आहे.
सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ या दिवशी कसोटी पदार्पण केले. त्यानंतर तब्बल २४ वष्रे त्याने क्रिकेटवर राज्य केले. सुख-दु:खाचे अनेक चिरंतन क्षण त्याच्या खेळातून क्रिकेटरसिकांना मिळाले. त्यामुळे त्याची निवृत्ती भावनिक आणि चटका लावणारी आहे.
धावा, विक्रम यांचे अनेक एव्हरेस्ट सचिनने पादाक्रांत केले. त्यामुळे पुढील अनेक वष्रे त्याच्या खेळाचे विक्रम अन्य क्रिकेटपटूंना साद घालतील. त्यामुळेच सचिनच्या तोडीचा दुसरा खेळाडू पुन्हा कदापि जन्माला येणार नाही, असे क्रिकेटक्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
आकडय़ांच्या भाषेत सांगायचे झाले तर १९८ कसोटी सामने खेळलेल्या सचिनच्या खात्यावर ५३.८६च्या सरासरीने १५८३७ धावा जमा आहेत. समकालीन क्रिकेटमधील कोणीही क्रिकेटपटू त्याच्या आसपाससुद्धा नाही. प्रेरक हास्य, कुरळे केस, आदी वैशिष्टय़ जपणाऱ्या सचिनमध्ये क्रिकेटमधील अवर्णनीय ऊर्जा आणि गुणवत्ता सामावली होती. त्यामुळे सचिनच्या निवृत्तीचा निर्णय म्हणजे देव निवृत्त होतोय, ही भावना क्रिकेटरसिकांमध्ये आहे.

सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट.. सचिन द ग्रेट..
– केव्हिन पीटरसन, इंग्लंडचा खेळाडू

सचिनसोबत भविष्यात खेळायला मिळणार नाही किंवा सचिनला खेळताना पाहायला मिळणार नाही, ही कल्पनाच भयावह आहे.
– इरफान पठाण, भारताचा वेगवान गोलंदाज

क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजाने निवृत्ती पत्करली, हे ऐकणे दु:खदायी आहे. एका माणसाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली तो म्हणजे सचिन!!!
– इऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला सचिन रमेश तेंडुलकर अखेर निवृत्त होतोय. माझे प्रेरणास्थान आणि युगपुरुष असलेल्या सचिनविरुद्ध खेळणे, हा निखळ आनंद होता.
मायकेल वॉन, इंग्लंडचा माजी कर्णधार

सचिनला पहिल्यांदा नेटमध्ये खेळताना पाहिले, तेव्हाच त्याच्यातील महानतेची कल्पना आली होती. आक्रमकपणा आणि सर्वोत्तम तंत्रशुद्ध फलंदाज असलेल्या सचिनशी अन्य कुठल्याही खेळाडूशी तुलना होऊ शकत नाही. असा कोणताही फटका नाही, जो सचिनच्या बॅटमधून निघालेला नाही. आता सचिनची जागा भरून काढणे भारतीय क्रिकेटला जड जाणार आहे.
– सुनील गावस्कर, भारताचे महान फलंदाज

खेळाप्रती असलेल्या निष्ठेमुळेच सचिन महानतेच्या शिखरावर पोहोचला. एखादा खेळ इतक्या गंभीरतेने घेणारा खेळाडू मी पाहिला नव्हता. पहिल्या दौऱ्यापासूनच सराव करताना सचिनने कधीच लवकर मैदान सोडले नाही. स्टेडियममधील कर्मचाऱ्यांना सचिनला सराव थांबवण्यासाठी विनवण्या कराव्या लागायच्या.
– चंदू बोर्डे, भारताचे माजी कर्णधार

सचिनच्या निर्णयाने मी चकित झालो. सचिनने आणखी एक वर्ष खेळावे, असे मला वाटत होते. भारताने जगाला दिलेला सर्वोत्तम खेळाडू म्हणजे सचिन. युवा पिढीसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जवळपास सर्वच विक्रम आपल्या नावावर केले.
– दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार

सचिनने योग्य वेळी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मालिकेच्या आधी हा निर्णय घेतल्यामुळे मी खूप आनंदी आहे. सचिनचे अखेरचे दोन सामने कोलकातात असोत वा मुंबईत, सचिनप्रती सन्मान दाखवण्यासाठी देशातील जनतेने या सामन्यांना अलोट गर्दी करावी, अशीच विनंती मी करेन.
– सौरव गांगुली, भारताचा माजी कर्णधार

सचिनच्या निर्णयाने मी आश्चर्यचकित झालो नाही. सचिनच्या निर्णयाचा आदर करायलाच हवा. सचिनने आपल्या अप्रतिम फलंदाजीने देशाची मान उंचावली आहे आणि चाहत्यांना आनंद मिळवून दिला आहे, त्यामुळे त्याच्या कारकिर्दीचे स्मरण व्हायलाच हवे.
– मोहम्मद अझरुद्दीन, भारताचे माजी कर्णधार

भारतीय आणि जागतिक क्रिकेटसाठी हा वाईट दिवस म्हणावा लागेल. प्रत्येक प्रतिस्पर्धी गोलंदाजाला सचिनचा बळी मिळवण्याची इच्छा असायची. पण बऱ्याच वेळा सचिनच बाजी मारायचा. तो एक महान खेळाडू आहे.
– मुथय्या मुरलीधरन, श्रीलंकेचा महान फिरकीपटू