त्रिपुराची राजधानी असणाऱ्या आगरताळा येथील एका क्रिकेटच्या सामन्यादरम्यान एका तरुण खेळाडूचा मृत्यू झाला. 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेआधीच्या सराव सामन्यामध्ये मिथुन देवबर्मा या खेळाडूचा हृदयविकाराच्या तिव्र मृत्यू झाला. खेळताना मिथुन मैदानावरच कोसळला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र तिथे पोहचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

शहरातील महाराजा बिर ब्रिक्रम क्रिकेट स्टेडिअयमध्ये एका सराव सामन्यात मिथुन खेळत होता. मिथुन मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना अचानक खाली कोसळला. त्याच्या संघातील अन्य खेळाडूंनी तातडीने त्याला जवळच्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्याने मिथुनचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मैदानात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. इतक्या कोवळ्या वयात मिथुनचा हृदय विकाराचा झटका कसा आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिथुनचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल समोर आल्यावरच नक्की काय झाले होते याची माहिती स्पष्ट होईल. मिथुनच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मानिक शाह यांनी रुग्णालयात धाव घेतली. शाह यांनी मिथुनच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

अशाप्रकारे क्रिकेट खेळताना मैदानात खेळाडूचा मृत्यू होण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी याच वर्षी माजी रणजी क्रिकेटपटू राजेश घोडगे यांचा एका क्लब सामन्याच्या दरम्यान हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. नवी मुंबईतही चंद्रकांत म्हात्रे या ३६ वर्षीय क्रिकेटपटूचा हृदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता. भोपाळमध्येही एका स्थानिक सामन्यादरम्यान एका क्रिकेटपटूचा असाच दूर्देवी मृत्यू झाला होता.