आंतरराष्ट्रीय क्रिकेटला इंग्लंडच्या रुपाने नवीन विश्वविजेता मिळाला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर रंगलेल्या अंतिम सामन्यात सुपरओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर मात केली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांमधला सामना बरोबरीत सुटला होता, यानंतर सुपरओव्हरमध्येही विजयासाठी १६ धावा हव्या असताना न्यूझीलंडचा संघ पंधराच धावा करु शकला.

अखेरीस इंग्लंडला सामन्यात सर्वाधिक चौकार लगावल्याच्या निकषावर विजेता घोषित करण्यात आलं. मात्र आयसीसीच्या या नियमावर माजी भारतीय खेळाडू संतापले आहेत. जर सामना इतका उत्कंठावर्धक होत असेल, चौकारांच्या निकषावर विजेता कसा घोषित केला जाऊ शकतो असा सवाल खेळाडूंनी विचारला आहे.

दरम्यान इंग्लंडकडून बेन स्टोक्सने दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अंतिम सामन्यातल्या खेळीसाठी स्टोक्सला सामनावीराचा किताब घोषित करण्यात आला.