गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर मात करत यजमान इंग्लंडने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तब्बल २७ वर्षांनी इंग्लंडचा संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरला. मात्र बर्मिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या या उपांत्य सामन्यालाही खराब पंचगिरीचा फटका बसलाच. इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचललेल्या जेसन रॉयला मैदानावरील पंच कुमार धर्मसेना यांनी चुकीच्या पद्धतीने झेलबाद ठरवलं.

अवश्य वाचा – World Cup 2019 : यजमान संघ साधणार का विजयाची हॅटट्रीक??

जेसन रॉयने आपला सहकारी जॉनी बेअरस्टोच्या साथीने इंग्लंडच्या विजयाची पायाभरणी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर ८५ धावसंख्येवर खेळत असताना जेसन रॉय पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाच्या मागे फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि चेंडू ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक कॅरीच्या हातात जाऊस विसावला. प्रत्यक्षात चेंडू आणि बॅटमध्ये मोठं अंतर असलं तरीही पंच कुमार धर्मसेना यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी रॉय बाद असल्याचं अपील उचलून धरलं.

अवश्य वाचा – World Cup 2019 : इंग्लंडची ९ हजारहून अधिक दिवसांची प्रतिक्षा फळाला

पंच कुमार धर्मसेना यांच्या निर्णयामुळे रॉय चांगलाच आश्चर्यचकीत झाला. त्याने यानंतर मैदानावरच पंचाच्या या निर्णयाविरोधात हुज्जत घालत आपली नाराजी व्यक्त केली. जेसन रॉयकडून आयसीसीच्या Article 2.8 नियमाचा भंग झाल्यामुळे त्याच्या मानधनातली ३० टक्के रक्कम कापण्यात आली. मैदानात पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी जेसन रॉयवर बंदीची कारवाई केली जाऊ शकत होती, मात्र सामना संपल्यानंतर झालेल्या सुनावणीत जेसन रॉयने शिक्षा मान्य करत आपल्या डोक्यावरील बंदीची टांगती तलवार हटवली आहे. दरम्यान पंच धर्मसेना यांच्या चुकीच्या निर्णयावर सोशल मीडियावर चांगलीच टीका होत आहे.

अवश्य वाचा – Video : क्रिकेटला राजकीय रंग, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामन्यात बलुचिस्तानच्या मुद्द्यावर बॅनरबाजी