२०१९ विश्वचषक स्पर्धेत रविवारी दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. १६ जूनला मँचेस्टरच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक क्रीडाप्रेमीची नजर या सामन्याकडे होती. न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर भारतीय संघ आता सर्वात महत्वाच्या लढतीसाठी मँचेस्टरला रवाना झाला आहे. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टीम इंडियाचा मँचेस्टरला रवाना होतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन हा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्यामुळे लोकेश राहुलला सलामीला पाठवल्यानंतर नवीन टीम इंडिया पाकिस्तानी गोलंदाजीचा कसा सामना करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाची या स्पर्धेतली सुरुवात फारशी चांगली झालेली नाहीये. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही प्रकारात पाकिस्तानी संघ आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाहीये. त्यामुळे रविवारी रंगणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.