इंग्लंड-पाकिस्तान पहिली कसोटी आजपासून; इंग्लंड संघात जेम्स अँडरसनऐवजी जेक बॉलला संधी

स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाचा कलंकित इतिहास बाजूला सारत क्रिकेट कारकीर्दीची नव्याने सुरुवात करण्यासाठी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर उत्सुक आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी लॉर्ड्स येथे सुरू होत आहे.

सहा वर्षांपूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाने कलंकित झाली होती. कर्णधार सलमान बटच्या सूचनेवरून जाणीवपूर्वक नोबॉल टाकणाऱ्या मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफची कारकीर्द याप्रकरणाने धोक्यात आली. एका सायंदैनिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्रकरणाची चौकशी केली. त्यानुसार बट्ट आणि आमिर यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. पाच वर्षांच्या कालावधीमुळे आमिरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करता येईल का याविषयी साशंकता होती. मात्र शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आमिरने जिद्दीने वाटचाल करत राष्ट्रीय संघात स्थान पटकावले आहे.

४२ वर्षीय मिसबाह उल हककडे पाकिस्तानच्या नेतृत्त्वाची धुरा आहे. अनुभवी युनिस खानसह मोहम्मद हफीझ, अझर अली, असाद शफीक यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. यष्टीरक्षक फलंदाज सर्फराझ अहमद पाकिस्तानसाठी उपयुक्त खेळाडू आहे. उत्तेजक सेवनप्रकरणी बंदीची शिक्षा पूर्ण करून परतलेल्या फिरकीपटू यासिर शाहवर गोलंदाजीचा भार आहे. आमिरसह राहत अली, वहाब रियाझ हे वेगवान आक्रमण सांभाळतील. इम्रान खान, इफ्तिकार अहमद, झुल्फिकार बाबर यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुसरीकडे श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय साकारणाऱ्या इंग्लंडच्या संघात दुखापतींमुळे काही बदल झाले आहेत. खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असल्यामुळे प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन लॉर्ड्स कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी जेक बॉलला संधी देण्यात आली आहे.

श्रीलंकेविरुद्ध धावांची टांकसाळ उघडणाऱ्या जॉनी बेअरस्टोकडून इंग्लंडला तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, अ‍ॅलेक्स हेल्स, जो रूट, जेम्स विन्स आणि गॅरी बॅलन्स फलंदाजीचा भार वाहतील.

अँडरसनच्या अनुपस्थितीत स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजीच्या आक्रमणाची धुरा सांभाळेल. मोइन अलीला अष्टपैलू चमक दाखवावी लागणार आहे.

संघ-

इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), अ‍ॅलेक्स हेल्स, जेम्स विन्स, गॅरी बॅलन्स, मोइन अली, जो रूट, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेक बॉल, स्टीव्हन फिन, टॉबी रोलँड जोन्स.

पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), असाद शफीक, अझर अली, इफ्तिकार अहमद, इम्रान खान, मोहम्मद आमिर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद रिझवान, राहत अली, सामी अस्लम, सर्फराझ अहमद, शान मसूद, सोहेल खान, वहाब रियाझ, यासिर शाह, युनूस खान, झुल्फिकार बाबर.

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर
  • वेळ : दुपारी ३.३० पासून