क्रिकेटचे मैदान हे कायम अनिश्चित घटनांसाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या सामन्यात केव्हा काय होईल याचा काहीही नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार कामगिरीमुळे गमावतो. काही वेळा मैदानात दोन संघांच्या खेळाडूंमध्ये वाद होतात, तर काही वेळा एखादा खेळाडू थेट अंपारशीच वाद घालतो. असे अनेक चित्रविचित्र किस्से क्रिकेटच्या मैदानावर घडत असतात. मात्र नुकतीच क्रिकेटच्या मैदानावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

हैदराबादमध्ये एका क्रिकेट सामन्याच्या दरम्यान क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू झाला. इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रोनिकलच्या वृत्तानुसार, एका स्थानिक एकदिवसीय सामन्यात ४१ वर्षीय विरेंद्र नाईकचा मृत्यू झाला. विरेंद्र हा हैदराबादच्या मारडपल्ली स्पोर्टिंग क्लबचा खेळाडू होता. रविवारी झालेल्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतर ठोकले. पण बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर त्याचा मृत्यू झाला. अहवालात दिलेल्या माहितीनुसार विरेंद्रचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

विरेंद्रने रविवारी झालेल्या क्रिकेट सामन्यात दमदार अर्धशतक ठोकले. त्याने आपल्या संघासाठी ६६ धावांची खेळी केली. पण पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे त्याला माघारी परतावे लागले. बाद झाल्यानंतर तो जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये गेला, तेव्हा त्याचं डोकं भिंतीवर आपटलं आणि तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला कारने रूग्णालयात नेले, पण तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

विरेंद्रने सिकंदराबादच्या यशोदा रूग्णालयात शेवटच्या श्वास घेतला. विरेंद्र हा छातीशी निगडीत आजारवर उपचार घेत होता, अशी माहिती विरेंद्रचा भाऊ अविनाशने पोलिसांना दिली. त्याचे अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी सावंतवाडीला होणार आहेत.