भारताची अष्टपैलू क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीचे मत

आयसीसी विश्वचषक  क्रिकेट स्पर्धेनंतर देशात महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे महिला क्रिकेटपटूंनाही खेळताना आनंद आणि समाधान मिळत आहे, असे मत भारताची अष्टपैलू क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीने व्यक्त केले. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

‘‘मागील वर्षी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषकानंतर महिलांच्या क्रिकेटमध्ये फार मोठा बदल दिसून आला आहे. चाहत्यांचा महिला क्रिकेटकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन हा यातील एक महत्त्वपूर्ण बदल आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेला विजय किंवा सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव पाहून एक गोष्ट लक्षात आली आहे की चाहते महिला क्रिकेट नियमितपणे पाहू लागले आहेत. ते स्टेडियममध्येसुद्धा मोठय़ा संख्येने सामने पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत आणि याचे मुख्य श्रेय भारताच्या विश्वचषकाच्या कामगिरीला जाते,’’ असे वेदाने सांगितले.

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांविरुद्ध तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. याप्रसंगी भारताची प्रभारी कर्णधार हरमनप्रीत कौर तसेच एकदिवसीय व कसोटी सामन्यांची कर्णधार मिताली राज यांच्या नेतृत्वशैलीबाबत वेदा म्हणाली, ‘‘मिताली ही शांत स्वभावाची असून, ती रचनात्मक विचार करते, तर हरमनप्रीत तिच्या खेळाप्रमाणेच आक्रमक स्वभावाची आहे. कारकीर्दीत प्रत्येकालाच विविध खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळावे लागते. त्यामुळे या दोघींच्याही नेतृत्वाखाली मी तितक्याच आत्मविश्वासाने खेळते. विशेष म्हणजे दोघीही तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ खेळण्यास सूट देतात.’’

ती पुढे म्हणाली, ‘‘क्रिकेट खेळात तुम्हाला साहजिकच स्वत:च्या आहाराकडे व व्यायामाकडे विशेष लक्ष द्यवे लागते. व्यायामाला तडजोड केल्यास तुम्हाला तुमचे संघातील स्थान गमवावे लागू शकते. म्हणूनच मी एकही दिवस सरावाला कंटाळा करत नाही. तंदुरुस्तीमुळेच मला मैदानावर माझे शंभर टक्के योगदान देता येते.’’

सध्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या पराभवांच्या मालिकांबाबत वेदा म्हणाली, ‘‘पराभव तुम्हाला खूप काही शिकवून जातो. हा एक खेळाचाच भाग आहे आणि यामधून लवकरच आम्ही बाहेर पडू. त्यामुळे त्याची चिंता करण्याची गरज नाही.’’