एएफपी, लास वेगास : लास वेगासच्या हॉटेलमध्ये एका अमेरिकन मॉडेलवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप जगविख्यात फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने नाकारला आहे. तसेच लैंगिक अत्याचार हा घृणास्पद प्रकार असल्याचे रोनाल्डोने त्याच्या ट्विटर खात्यावर म्हटले आहे.

पोर्तुगीज आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये त्याने हे ट्वीट केले आहे. मी ज्या तत्त्वांवर विश्वास ठेवतो, त्यात लैंगिक अत्याचारांना अजिबात थारा नाही. हा एक घृणास्पद प्रकार असल्याने मी हे आरोप ठामपणे फेटाळत असल्याचे रोनाल्डोने सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणात माझ्या नावाचा वापर करून काही जण प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावादेखील त्याने केला आहे.

अमेरिकेत १३ जून २००९ च्या रात्री एका हॉटेलमध्ये रोनाल्डोने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अमेरिकेची ३४ वर्षीय मॉडेल मेओरगा हिने केला आहे. तसेच या घटनेनंतर मी स्थानिक पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासह तोंड बंद ठेवण्यासाठी मला पावणेचार लाख अमेरिकन डॉलर देऊन दबाव टाकण्यात आल्याचा आरोप मेओरगा हिने केला होता.

चार सामन्यात वगळले

रोनाल्डो याने आरोप फेटाळले असले तरी त्याच्या पोर्तुगाल देशाच्या संघातून त्याला पुढील चार सामन्यांसाठी वगळण्यात आले आहे. तो नवीन क्लबला जोडला गेला असल्याने तो काही काळ उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे प्रशिक्षक फर्नाडो सॅँटोस यांनी म्हटले आहे.