युव्हेंटसचा लीसवर विजय, नवव्या विजेतेपदासाठी दावेदार

रोम : ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीवर साकारलेला एक गोल आणि दोन गोल करण्यात केलेले साहाय्य यामुळे युव्हेंटसने १० जणांसह खेळणाऱ्या लीस संघावर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह युव्हेंटसने नवव्यांदा सेरी-ए फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याच्या दिशेने कूच केली.

टाळेबंदीनंतर इटलीतील फुटबॉलला सुरुवात झाल्यानंतर रोनाल्डो गोल करण्यासाठी धडपडत होता. मात्र शुक्रवारी रात्री त्याला सूर गवसला आणि एकापाठोपाठ गोल करण्यासाठी मदत करत त्याने आपल्या चाहत्यांनाही खूश केले. युव्हेंटसने दुसऱ्या क्रमांकावरील लॅझियोला सात गुणांनी मागे टाकत ६९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

रोनाल्डोला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र त्याने मारलेला फटका गोलजाळ्याच्या वरून गेला. लीस संघाने आश्वासक सुरुवात केली. पण त्यांचा बचावपटू फॅ बियो लुसिओनी याला पंचांनी लाल कार्ड दाखवल्यामुळे जवळपास एक तास लीस संघाला १० जणांसह खेळावे लागले. याचा युव्हेंटसने अचूक फायदा उठवला.

पहिल्या सत्रात एकाही संघाला गोल करण्यात अपयश आल्यानंतर पावलो डायबला याने रोनाल्डोने दिलेल्या पासवर ५३व्या मिनिटाला युव्हेंटसचे खाते खोलले. आठ मिनिटांनंतर मिळालेल्या पेनल्टीवर रोनाल्डोने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. गोंझालो हिग्यूएनचे मैदानावर आगमन झाल्यानंतर रोनाल्डोच्या साहाय्याने त्याने ८३व्या मिनिटाला आणखी एक गोल करत युव्हेंटसला मोठी आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनंतर डग्लस कोस्टाच्या क्रॉसवर मथियास डे लाइट याने चौथा गोल करत युव्हेंटसच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

‘‘सामन्याचा निकाल आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. सुरुवातीला आम्हाला गोल करण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यानंतर पहिल्या सत्रानंतर सूर गवसल्यावर आम्ही मागे वळून पाहिले नाही. आम्ही आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले,’’ असे युव्हेंटसचे प्रशिक्षक मॉरिझियो सारी यांनी सांगितले.