रोनाल्डो, इस्कोचा प्रत्येकी एक गोल; लेव्हांटेचा पराभव
अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धच्या पराभवानंतर ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाद झालेला रिअल माद्रिद क्लब गुरुवारी विजयपथावर परतला. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि इस्कोच्या प्रत्येकी एक गोलमुळे माद्रिदने गुणतालिकेत तळाला असलेल्या लेव्हांटेचा ३-१ असा पराभव केला. माद्रिदच्या विजयात लेव्हांटेच्या दिएगो मारिनोच्या स्वयंगोलचा समावेश आहे. या विजयासह माद्रिदने ५७ गुणांसह तिसरे स्थान अबाधित राखले आहे.
रोनाल्डोने ३४व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यंदाच्या हंगामातील त्याचा हा २३वा गोल ठरला. ३८व्या मिनिटाला लेव्हांटेचा गोलरक्षक डिएगो मारिनोच्या स्वयंगोलने माद्रिदची आघाडी २-० अशी दुप्पट केली. मात्र, पुढच्याच क्षणाला ब्राझीलचा आघाडीपटू देयव्हर्सन अ‍ॅकोस्टाने गोल करून लेव्हांटाचे गोल खाते उघडले. दुसऱ्या सत्रातील भरपाई वेळेत फ्रान्सिस्को अलर्कोन (इस्को)ने गोल करून माद्रिदचा ३-१ असा विजय निश्चित केला. घरच्या मैदानावर अ‍ॅटलेटिकोविरुद्धच्या पराभवानंतर मिळवलेल्या या विजयामुळे माद्रिदच्या चमूत नवचैतन्य आले आहे.
माद्रिदला आणखी ११ सामने शिल्लक असून गुणतालिकेत तिसरे स्थान अबाधित राखण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. व्हिलारिअल ५३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. माद्रिदने स्पध्रेअंती तिसरे स्थान कायम राखल्यास त्यांना पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळणार आहे. ‘‘आम्हाला खेळाप्रति निष्ठा हवी आहे. प्रत्येक खेळाडूच्या शंभर टक्के योगदानाची आम्हाला गरज आहे. आज ज्या प्रकारे आमचा खेळ झाला, त्याने मी आनंदित आहे,’’ अशी प्रतिक्रिया माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान याने दिले.