चार गोलसह सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत दुसरा; माद्रिदचा सेल्टा व्हिगोवर विजय
सहकारी खेळाडूंसमोर आदर्श प्रस्थापित करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने ला लिगा स्पर्धेतील सेल्टा व्हिगोविरुद्ध चार गोल केले. त्यामुळे रोनाल्डोने ला लिगा स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. रोनाल्डोच्या नावावर या स्पर्धेत २५२ गोल आहेत तर ३०५ गोलसह मेस्सी अव्वल स्थानी आहे. रोनाल्डोने तेल्मो झारा यांचा २५१ गोलचा विक्रम मागे टाकला. रोनाल्डोच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर रिअल माद्रिदने सेल्टा व्हिगोचा ७-१ असा धुव्वा उडवला.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक गोल बार्सिलोनाच्या लुइस सुआरेझच्या (२५) नावावर होता. सेल्टा व्हिगोविरुद्धच्या कामगिरीनंतर रोनाल्डो (२७) गोलसह तालिकेत अव्वल स्थानी आहे. कोपा डेल रे स्पर्धेतून गच्छंती झालेल्या आणि ला लिगा स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाद झालेल्या रिअल माद्रिदने सन्मान वाचवण्याच्या इराद्याने खेळ केला.
मध्यंतराला चार मिनिटे बाकी असताना पेपेने रिअलचे खाते उघडले. विश्रांतीनंतर लगेचच रोनाल्डोने शानदार गोल केला. काही मिनिटांतच कॉर्नर किकच्या आधारे रोनाल्डोने आणखी एक गोल केला. सेल्टातर्फे इगो अस्पासने पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. दोनच मिनिटांत रोनाल्डोने गोलरूपी प्रत्युत्तर दिले. ७६व्या मिनिटाला आणखी एक गोल करत रोनाल्डोने रिअलच्या विजयाचा पाया रचला. पुढच्याच मिनिटाला जेसने गोल करत रिअलची आघाडी भक्कम केली. दुखापतीतून सावरलेल्या गॅरेथ बॅलेला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. ८१व्या मिनिटाला गोल करत बॅलेने रिअलच्या दिमाखदार विजयावर शिक्कामोर्तब केले.