पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्यास सुरुवात केल्यानंतर भारताने आता क्रीडा क्षेत्रातही पाकची कोंडी केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या, पाकिस्तान सुपर लिग या स्पर्धेचं प्रक्षेपण भारतात करणार नाही अशी भूमिका D-Sports या वाहिनीने घेतली आहे. या वाहिनीकडे पाकिस्तान सुपर लिगचे भारतात भारतातील प्रक्षेपणाचे हक्क आहेत.

मात्र पुलवामा जिल्ह्यातील अतिरेकी हल्ल्यानंतर D-Sports वाहिनीने या स्पर्धेचं प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. “आम्ही पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रसारण थांबवले आहे. राष्ट्रीय मुद्द्यांवर आम्हीही संवेदनशील आहोत. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्याचं आम्ही ठरवलं”, असं चॅनेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘मुंबई मिरर’ला सांगितलं. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळण्यास आधीच मनाई करण्यात आलेली आहे, त्यातच आता पीएसलच्या सामन्यांचंही प्रेक्षपण होणार नाही.