महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत आपल्या २० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीला अलविदा केला. पॅरिस सेंट जर्मेन क्लबने एक वर्षांच्या कराराचा प्रस्ताव बेकहॅमसमोर ठेवला होता. पण बेकहॅमने हा प्रस्ताव फेटाळून लावत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
तब्बल दोन दशके आंतरराष्ट्रीय फुटबॉलवर अधिराज्य गाजवणाऱ्या बेकहॅमने मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद, एसी मिलान, लॉस एंजेलिस गॅलॅक्सी तसेच पॅरिस सेंट जर्मेन या बलाढय़ संघांचे प्रतिनिधित्व केले. ‘‘यापुढेही खेळत राहण्यासाठी पॅरिस सेंट जर्मेन संघाने मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण यशोशिखरावर असताना कारकीर्दीचा समारोप करण्याची हीच योग्य वेळ होती. अनेक बलाढय़ संघांतर्फे खेळताना प्रतिष्ठेच्या सर्व स्पर्धाची जेतेपदे पटकावण्याचे माझे स्वप्न केव्हाच पूर्ण झाले होते,’’ असे बेकहॅमने सांगितले.
इंग्लंड संघातर्फे सर्वाधिक ११५ सामन्यांत प्रतिनिधित्व करताना बेकहॅमने विक्रमाची नोंद केली. यापुढे शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचे धडे देण्याचे बेकहॅमने ठरवले आहे. ‘‘घरच्यांचा पाठिंबा, प्रेरणा आणि त्याग याशिवाय मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो नसतो. पत्नी विक्टोरिया आणि मुलांनी मला कायम प्रेरणा दिली. सहकारी तसेच प्रशिक्षक आणि चाहत्यांचाही मी ऋणी आहे,’’ असेही बेकहॅम म्हणाला. १९९६मध्ये मोल्डोवाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंड संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या बेकहॅमने २००० ते २००६दरम्यान संघाचे नेतृत्व सांभाळले होते. मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक आणि बेकहॅमचे सल्लागार अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांनी निवृत्ती पत्करल्याच्या काही दिवसानंतर बेकहॅमने आपल्या कारकीर्दीचा समारोप केला.