चेंडू फेरफार प्रकरणामुळे एक वर्षांची निलंबनाची शिक्षा भोगून परतल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांना इंग्लंडमधील चाहत्यांच्या डिवचणीला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात तर दोन चाहत्यांनी अक्षरश: पिवळ्या रंगाच्या ‘सँडपेपर’चे वस्त्र परिधान करत वॉर्नर-स्मिथला टोला लगावला. मार्च २०१८ मध्ये वॉर्नर, स्मिथ व कॅमेरून बँक्रॉफ्ट यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पिवळसर रंगाचा ‘सँडपेपर’ वापरून चेंडूशी फेरफार केल्यामुळे बँक्रॉफ्टला नऊ महिने, तर वॉर्नर आणि स्मिथ यांना एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले. वॉर्नरने अर्धशतक झळकावल्यानंतरही त्याचे अभिवादन करण्याऐवजी त्याची हुर्यो उडवली. २२वे षटक सुरू असताना छायाचित्रकाराने स्टेडियमलगतच असलेल्या एका इमारतीच्या बाल्कनीत उभ्या चाहत्यांना टिपले. या चाहत्यांनी वॉर्नर-स्मिथला डिवचण्यासाठी वेगळी युक्ती लढवली होती. त्यामुळे क्षणातच समाजमाध्यमांवर या छायाचित्राविषयी चर्चा रंगली.

वॉर्नर-स्मिथ कामगिरीनेच सर्वाची तोंडे बंद करतील -झम्पा

ब्रिस्टल : डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा काही प्रेक्षकांकडून केलेली हुर्यो सहन करावी लागली. मात्र, ते दोघे व्यावसायिक खेळाडू असून त्यांच्या कामगिरीनेच ते सर्वाची तोंडे बंद करतील, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाने व्यक्त केला.

‘‘या सामन्यात वॉर्नरने सर्वाधिक ८९ धावांची खेळी करीत ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला, तरीदेखील प्रेक्षकांकडून विविध आवाज काढून वॉर्नर आणि स्मिथची खिल्ली उडवली जात होती. परंतु सर्वच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले आहे, तसेच अशा परिस्थितीतही हे दोघे स्वत: शांत राहून खेळावर लक्ष केंद्रित करीत आहेत,’’ असे झम्पाने सांगितले.