सर्वोत्तम पाच गेमच्या प्रस्तावावर मतदान

नवी दिल्ली : बॅडिमटनमध्ये सध्या प्रचलित असलेल्या सर्वोत्तम तीन गेमऐवजी सर्वोत्तम पाच गेमची गुणपद्धती अमलात आणण्याच्या प्रस्तावावर शनिवारी जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान होणार आहे.

पॉल ईरिक होयेर लार्सेन यांच्या अध्यक्षतेखाली २०१४मध्ये प्रथमच सर्वोत्तम पाच गेमच्या पद्धतीचे प्रयोग सामन्यांसाठी झाले होते. परंतु त्याला पुरेसे पाठबळ मिळाले नव्हते. मागील वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ११ गुणांच्या सर्वोत्तम पाच गेमच्या प्रस्तावाला खेळाडू आणि प्रशिक्षकांनी मतदानाद्वारे विरोध दर्शवला होता. येत्या सभेत बॅडमिंटनमधील गुणपद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव इंडोनेशिया आणि मालदीव बॅडमिंटन संघटनांनी सादर केला आहे. त्याला कोरिया, चायनिज तैपेईसह आशियाई बॅडमिंटन संघटनेने पाठिंबा दिला आहे.

२०२०-२०२४च्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या योजनेनुसार या प्रस्तावाला महासंघाच्या परिषदेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे खेळात नावीन्यपूर्ण बदल होऊन चुरस वाढेल. टोक्यो ऑलिम्पिक आणि परॉलिम्पिक क्रीडा स्पध्रेत नव्या गुणपद्धतीचा वापर केला जाणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.