जागतिक कनिष्ठ विजेत्या दीपक पुनियाने वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो गटाची शनिवारी अंतिम फेरी गाठतानाच टोक्यो ऑलिम्पिकमधील स्थानसुद्धा निश्चित केले. रविवारी अंतिम फेरीत दीपकची इराणच्या हसन याझदानीशी गाठ पडणार आहे.

कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या वरिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत खेळणाऱ्या दीपकने उपांत्य सामन्यात स्वित्र्झलडच्या स्टीफन रिशमूथचा ८-२ असा आरामात पराभव केला. २०१६मध्ये जागतिक कॅडेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या दीपकने गेल्याच महिन्यात ईस्टोनिया येथे झालेल्या कनिष्ठ जागतिक स्पर्धेत जेतेपदावर मोहोर उमटवली होती.

२० वर्षीय दीपकने जागतिक स्पर्धेतील चौथ्या पदकाची निश्चिती करताना भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची खात्री करून दिली. विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि रवी दहिया यांनी आधीच कांस्यपदके निश्चित केली आहेत. याचप्रमाणे हे सर्वच जण ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. रविवारी राहुल आवारेमुळे भारताच्या खात्यावर पाचव्या पदकाची भर पडू शकते. भारताने २०१३मध्ये तीन पदके जिंकली होती.

दीपकच्या अष्टपैलूत्वाने उपांत्य सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मॅटवरील त्याचे आक्रमण, बचाव आणि क्षमता वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे ही संस्मरणीय कामगिरी त्याला साकारता आली. उपांत्य सामन्यात दीपकने सुरुवातीला १-० अशी आघाडी घेतली. मग रिशमूथला अस्मान दाखवत ४-० अशी आघाडी घेतली. मग दीपकने दोन गुण गमावले. परंतु पुन्हा जोरदार मुसंडी मारत त्याने सामना जिंकला.

दिल्लीच्या छात्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय दीपकने कोलंबियाच्या कार्लोस आर्टुरो मेंडीझचा ७-६ असा रोमहर्षक लढतीत पराभव करून ऑलिम्पिक पात्रता साधली. या सामन्यात एक मिनिट बाकी असताना दीपक ३-६ असा पिछाडीवर होता. मात्र अखेरच्या क्षणी त्याने सामन्याचे चित्रच पालटून टाकले. दीपकने सलामीच्या लढतीत कझाकस्तानच्या अ‍ॅडिलेट डॅव्हलुम्बायेव्हला ८-६ अशा फरकाने नमवले. मग तजाकस्तानच्या बखोदूर कोडिरोव्हचा ६-० असा पाडाव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

७९ किलो गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात जितेंदर पराभूत झाला, तर ९७ किलो गटाच्या पहिल्या फेरीत ऑलिम्पिक विजेत्या कायले फ्रेडरिक स्नायडरकडून पराभूत झाल्याने मौसम खत्रीचे आव्हान संपुष्टात आले.

महाराष्ट्राच्या राहुलची आज कांस्यपदकासाठी लढत

’ या सामन्यात सुरुवातीपासून बेकाने वर्चस्वपूर्ण कामगिरी करीत ८-१ अशी आघाडी घेतली. मग राहुलने हा फरक कमी करण्याचा जिद्दीने प्रयत्न केला. सामना संपल्यासाठी २१ सेकंदांचा अवधी बाकी असताना राहुल ६-८ असा पिछाडीवर होता.