डेल पोट्रो, थिइम, रडवानस्का, हालेप यांची आगेकूच

जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या अ‍ॅण्डी मरे आणि सेरेना विल्यम्स यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत वाटचाल केली. स्टॅनिसलॉस वॉवरिन्का, ज्युआन मार्टिन डेल पोट्रो यांच्यासह अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का, सिमोन हालेप, व्हीनस विल्यम्स यांनीही चौथी फेरी गाठली.

पाऊलो लोरेन्झीने मरेला विजयासाठी संघर्ष करायला भाग पाडले. मरेने ही लढत ७-६(४), ५-७, ६-२, ६-३ असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या मरेने दोन सेटमध्ये ४७ चुका केल्या. ३४ वर्षीय लोरेन्झी चमत्कार घडवणार असे चित्र होते. मात्र मरेने वेळीच खेळ सुधारत बाजी मारली.

‘‘लोरेन्झी अतिशय चांगला खेळाडू आहे आणि एकही गुण सहजतेने मिळू देत नाही. घाईघाईत माझ्या हातून चुका झाल्या. दोन सेटनंतर मी कमीत कमी चुका केल्या. लोरेन्झीच्या हातून झालेल्या चुकांचा फायदा उठवत आगेकूच केली,’’ असे मरेने सांगितले.

दुखापतींच्या ससेमिऱ्यातून बाहेर पडत खेळणाऱ्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने डेव्हिड फेररचा ७-६ (७-३), ६-२, ६-३ असा पराभव केला. निक कुर्यिगासने दुखापतीमुळे माघार घेतल्याने इल्या मार्चेन्कोला विजयी घोषित करण्यात आले. मॅरेथॉन लढतीत स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने डॅनियल इव्हान्सवर ४-६, ६-३, ६-७ (६-८), ७-६ (१०-८), ६-२ असा विजय मिळवला. ‘‘इव्हान्स अफलातून खेळला. तो प्रतिभाशाली खेळाडू आहे. विजयासाठी मला आटोकाट प्रयत्न करावा लागला,’’ असे वॉवरिन्काने सांगितले. डॉमिनिक थिइमने पाब्लो कारेनो बुस्टावर १-६, ६-४, ६-४, ७-५ अशी मात केली. केई निशिकोरीने निकोलस माहुतचा ४-६, ६-१, ६-२, ६-२ असा पराभव केला.

सिमोन हालेपने तिमेआ बाबोसवर ६-१, २-६, ६-४ असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने जोहाना लार्सनला ६-२, ६-१ असे सहजपणे नमवले. खांद्याच्या दुखापतीमुळे रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सेरेनाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. या विजयासह सेरेनाने मार्टिना नवरातिलोव्हाचा ३०६ ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत लढतीत विजयांचा विक्रम मोडला. ३०७ विजयांसह ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक लढती जिंकण्याचा विक्रम आता संयुक्तपणे रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांच्या नावावर आहे.

‘‘मार्टिनासारख्या महान खेळाडूचा विक्रम मोडणे रॉजरसारख्या दिग्गज खेळाडूच्या विजयांची बरोबरी करणे अद्भुत आहे. आणखी विजय मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. महिला क्रीडापटूही तंदुरुस्तीत कमी नाहीत आणि त्याही यशोशिखरे गाठू शकतात हे सिद्ध झाले आहे. खांद्याची दुखापत बरी झाल्याने आता सर्वोत्तम प्रदर्शन करणे शक्य झाले आहे,’’ असे सेरेनाने सांगितले.

व्हीनस विल्यम्सने लॉरा सिगमंडचा ६-१, ६-२ असा पराभव केला. कार्ला सुआरेझ नवारोने एलेना वेस्निनावर ६-४, ६-३ अशी मात केली. अ‍ॅग्निझेस्का रडवान्सकाने कॅरोलिन गार्सिआवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला.

पेसचे आव्हान संपुष्टात

भारताची सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी आपापल्या साथीदारांसोबत अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत आगेकूच केली आहे. मात्र मार्टिना हिंगीससोबत खेळणाऱ्या लिएण्डर पेसचे मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.महिला दुहेरीत सानियाने चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हासोबत तिसरी फेरी गाठताना व्हिक्टोरिजा गोलूबिक आणि निकोल मेलिचार यांना पराभूत केले. या सातव्या मानांकित जोडीची पुढील फेरीत बिगरमानांकित निकोल गिब्ज आणि नॅओ हिबिनो जोडीशी गाठ पडणार आहे. याचप्रमाणे बोपण्णाने कॅनडाच्या ग्रॅबिएला डॅब्रोस्कीच्या साथीने खेळताना ल्युकाझ क्युबोट आणि आंद्रे हॅव्हाकोव्हा यांचा ५-७, ६-३, १०-३ अशा फरकाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.गतविजेत्या हिंगीस-पेस जोडीला अमेरिकेच्या सातव्या मानांकित कोको व्हँडेवेघे आणि राजीव राम जोडीने ७-६ (१), ३-६, १३-११ असे पराभूत केले. शनिवारी पुरुष दुहेरीत पेस आणि आंद्रे बेगेमनचे आव्हान संपुष्टात आले होते.