मुंबईला हरवून विजयाची हॅट्ट्रिक साकारण्याचे दिल्लीचे मनसुबे
आयपीएलच्या नवव्या हंगामाचा पराभवाने प्रारंभ केल्यानंतर आता गतविजेत्या मुंबई इंडियन्सला नमवून विजयाची हॅट्ट्रिक साकारण्याचा निर्धार दिल्ली डेअरडेव्हिल्सने केला आहे. मात्र सर्वाचे लक्ष दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या कामगिरीकडे असणार आहे.
सलामीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सने नऊ विकेट्स राखून पराभव केल्यानंतर दिल्लीचा संघ कमालीचा सावरला आणि त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध विजय नोंदवले. दिल्लीच्या खात्यावर सध्या चार गुण जमा आहेत, तर पाच सामन्यांत दोन विजय आणि तीन पराभव अशी कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या खात्यावरही चार गुण जमा आहेत. मुंबईने पंजाब आणि बंगळुरूविरुद्ध विजयाची नोंद केली आहे. तर रायझिंग पुणे सुपरजायंट्स, गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडून मुंबईने हार पत्करली आहे.
कोलकाताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा डाव ९८ धावांत कोसळला होता, मात्र त्यानंतर त्यांनी फलंदाजीत कमालीची सुधारणा केली. पंजाबविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ११२ धावांचे लक्ष्य दिल्लीने आरामात पेलले. पण बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या शतकाची नोंद झाली. डी कॉकने ५१ चेंडूंत १०८ धावा केल्या. १९२ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखालील दिल्लीने सहज पेलले. डी कॉकशिवाय करुण नायरने ४२ चेंडूंत नाबाद ५४ धावा केल्या. याशिवाय दिल्लीकडे जे. पी. डय़ुमिनी, पवन नेगी आणि कार्लोस ब्रेथवेटसारखे सामन्याचा निकाल पालटू शकणारे फलंदाज आहेत. दिल्लीच्या वेगवान गोलंदाजीच्या माऱ्याचे नेतृत्व झहीर खानकडे असेल. याचप्रमाणे ख्रिस मॉरिस आणि मोहम्मद शमीसारखे गोलंदाजी त्यांच्याकडे आहेत. तर फिरकीची मदार लेग-स्पिनर अमित मिश्रा आणि नेगीवर असेल.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ संघरचनेच्या पाश्र्वभूमीवर अद्याप झगडताना दिसत आहे. मात्र कोहलीच्या बंगळुरूविरुद्धचे १७१ धावांचे लक्ष्य त्यांनी लीलया पार केले होते. दोन वेळा आयपीएल विजेत्या मुंबईने घरच्या मैदानावर पुणे आणि गुजरातकडून हार पत्करली. मात्र बंगळुरूविरुद्ध त्यांनी वानखेडेवर यंदाचा पहिला विजय नोंदवला. मुंबईच्या फलंदाजीची धुरा कर्णधार रोहित शर्मावर आहे. त्यांच्या दोन्ही विजयांमध्ये रोहितच्या अर्धशतकांचा सिंहाचा वाटा होता. मात्र अन्य सामन्यांत दिग्गज फलंदाजांचे अपयश दिसून आले. दुखापतग्रस्त लेंडल सिमन्सच्या जागी मार्टिन गप्तिलचा समावेश झाला आहे. मात्र तो हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अपेक्षांची पूर्तता करू शकला नव्हता. किरॉन पोलार्डने बंगळुरूविरुद्ध सामना जिंकून देणारी १९ चेंडूंत नाबाद ३९ धावांची खेळी उभारली होती. इंग्लंडचा जोस बटलर आणि अंबाती रायुडू यांच्यासारखे धडाकेबाज फलंदाज मुंबईकडे आहेत. हार्दिक पंडय़ा झगडत असताना त्याचा भाऊ कृणालने मात्र संधीचे सोने केले आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत मुंबईची गोलंदाजी न्यूझीलंडचा टिम साऊदी आणि मिचेल मॅक्क्लिनॅघन यांच्यावर अवलंबून आहे.

सामन्याची वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/एचडी.