ब्राझिलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डिनोने प्रीमिअर फुटसालच्या पहिल्याच लढतीत आपली चमक दाखवताना दिल्ली ड्रॅगन्स संघाला यजमान मुंबई वॉरियर्सवर ४-३ असा विजय मिळवून दिला. रोनाल्डिनोने चार गोल करत दिल्लीचा विजय खेचून आणला.

रोनाल्डिनोने तिसऱ्याच मिनिटाला लिएड्रो डे जीजसच्या पासवर दिल्लीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मुंबईला बरोबरी करण्याची संधी होती. मुंबईचा कर्णधार आणि मँचेस्टर युनायटेड क्बलचा दिग्गज फुटबॉलपटू रियान गिग्ज याचा गोल करण्याचा प्रयत्न दिल्लीचा गोलरक्षक स्टॅलना मॅटीयासने रोखला. मात्र, आठव्या मिनिटाला झुल्कर्नन रिकोने अप्रतिम खेळ करत मुंबईला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. पाच मिनिटांच्या आत रोनाल्डिनो दिल्लीच्या मदतीला धावला आणि पाहुण्यांनी २-१ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात रोनाल्डिनोने (२२ मि.) आणखी एका गोलची भर घातली. तिसऱ्या सत्रातील रोनाल्डिनोच्या गोलने दिल्लीने ४-१ अशी मजबूत आघाडी घेतली. आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाडय़ांवर दिल्लीचा संघ वरचढ ठरत होता. पहिल्या सत्रात मुंबईने गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या. गिग्जलाही फ्री किकवर गोल करण्यात अपयश आले, परंतु चौथ्या आणि अखेरच्या सत्रात मुंबईने दमदार पुनरागमन केले. फ्रासिंनी ल्युकास आणि गिग्ज यांनी अनुक्रमे ३६ व ३७व्या मिनिटाला गोल करून ही पिछाडी ३-४ अशी कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पराभव टाळण्यात अपयश आले.