एका खुनाच्या घटनेप्रकरणी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरूद्ध लूक आऊट नोटीस बजावली आहे. छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात २३ वर्षीय कुस्तीपटू सागर राणाचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले. पोलिसांनी अलीकडेच त्याच्या घरावर छापा टाकला होता, पण सुशील फरार आहे. सुशीलशिवाय इतर २० आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

या आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस एनसीआर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांत छापा टाकत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल टाऊन परिसरातील फ्लॅट रिकामा करण्यासाठी हा वाद सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रिन्स दलालला सुरुवातीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार आणि त्याचे अन्य साथीदार भांडणात सहभागी होते. हा वाद ४ मे रोजी झाला होता, त्यात दोघे जखमीही झाले होते. सागरला तातडीने रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

या घटनेप्रकरणी पोलीस कॅमेरा फुटेजद्वारे संबंधित लोकांचा शोध घेत आहेत. त्यामुळे काहींची ओळख पटवण्यात आली आहे. ज्यांची नावे समोर आली आहेत, पोलीस त्यांचे लोकेशन शोधत आहेत. या घटनेशी माझा काही संबंध नाही. आमचे कुस्तीपटू या भांडणात सामील नव्हते. आम्ही पोलिसांना कळवले, की काही अज्ञातांनी उडी मारुन हे भांडण केले, असे सुशील कुमारने घटनेच्या दुसर्‍याच दिवशी सांगितले होते.