डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवालने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत सायनाने इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्कावर 21-11, 21-12 अशा दोन सेट्समध्ये मात केली. डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची सायना नेहवालची ही दुसरी वेळ ठरली आहे.

अवश्य वाचा – Denmark Open Badminton : किदम्बी श्रीकांतचं आव्हान संपुष्टात

उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नोझुमी ओकुहारावर मात केल्यानंतर, उपांत्य सामन्यात सायनाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला होता. जॉर्जियाविरुद्ध पहिल्या सेटमध्ये सायनाने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. सायना नेहवालच्या झंजावातापुढे जॉर्जियाचा निभावच लागला नाही. सायनाने आक्रमक फटके खेळत जॉर्जियाला चांगलचं दमवलं. अखेर 21-11 च्या फरकाने सायनाने पहिला सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येही जॉर्जियाने सायनाला फारशी टक्कर दिली नाही. सायनाने नेहमीप्रमाणे आपलं वर्चस्व कायम राखत दुसरा सेट 21-12 ने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.