चेन्नई सुपर किंग्जकडून दारुण पराभव पत्करल्यावरही सनरायजर्स हैदराबादचे हौसले बुलंद आहेत. कारण आयपीएलच्या बादफेरीचा मार्ग त्यांच्यासाठी अवघड असला तरी अशक्य मुळीच नाही. शनिवारी हैदराबादचा सामना आहे तो किंग्ज इलेव्हन पंजाबशी. अनिश्चित निकालासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंजाबला हरवून गुणसंख्या वाढविण्याचे मनसुबे हैदराबादने आखले आहेत.
आयपीएलच्या सहाव्या पर्वाचा अखेरचा अंक आता सुरू झाला आहे. बादफेरीचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. हैदराबादने १२ सामन्यांपैकी ७ सामने जिंकत आपल्या खात्यावर १४ गुण जमा केले आहेत, तर पंजाबचे फक्त १० गुण झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर हैदराबादने शनिवारचा सामना जिंकल्यास त्यांच्या बादफेरीच्या आशा वाढू शकतील. कारण सध्या ते पाचव्या स्थानावर आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबला बादफेरीच्या आशा शाबूत ठेवण्यासाठी साखळीमधील उर्वरित चारही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून ७७ धावांनी पराभव पत्करणारा सनरायजर्सचा संघ त्या तुलनेत ‘प्ले-ऑफ’कडे अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करू शकतो.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायजर्सने प्रारंभीपासून विजय मिळवले होते. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांनी रोमहर्षक विजय प्राप्त केले होते. परंतु त्यांची ही विजयाची मालिका चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी खंडित केली. गोलंदाजी हे सनरायजर्सचे बलस्थान. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज डेल स्टेन, भारताचा इशांत शर्मा, लेग-स्पिनर अमित मिश्रा यांच्याप्रमाणेच श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा त्यांच्याकडे आहेत.
मोहालीच्या उसळणाऱ्या खेळपट्टीवर हा गोलंदाजीचा मारा कसा करिश्मा दाखवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तथापि, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टने ही खेळपट्टी धीमी आणि कोरडी असल्याचे नमूद केले होते.
पंजाबप्रमाणेच फलंदाजीच्या विभागात सनरायजर्सची चिंता कायम आहे. दुखापतीतून सावरलेला शिखर धवन आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी संघात आल्यापासून त्यांची फलंदाजी थोडी बरी होत आहे. मागील सामन्यांत हे दोघेही अपयशी ठरले होते. कर्णधार कुमार संगकारा आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी दाखवू शकलेला नाही.
दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाचा कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट काही सामन्यांच्या स्वयंघोषित विश्रांतीनंतर पुन्हा परतला आहे. त्याने राजस्थानविरुद्ध उपयुक्त ४२ धावांची खेळी साकारून सूरही गवसल्याचे स्पष्ट केले आहे. सातत्यपूर्ण फलंदाजी ही पंजाबची डोकेदुखी आहे. डेव्हिड हसी, शॉन मार्श, मनदीप सिंग आणि डेव्हिड मिलर हे फलंदाज सांघिक कामगिरी दाखविण्यात अपयशी ठरले आहेत.
गोलंदाजी हीच पंजाबची ताकद. मध्यमगती गोलंदाज प्रवीण कुमार, परविंदर अवाना, मनप्रीत गोनी, लेग-स्पिनर पीयूष चावला आणि डावखुरा फिरकी गोलंदाज बिपुल शर्मा यांच्यावर पंजाबच्या गोलंदाजीची मदार आहे.