मुंबई : भारत आणि पाकिस्तानसारख्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी माजी जलदगती गोलंदाज झहीर खान याने एक नवीन मुद्दा छेडला आहे. भारतीय संघाच्या क्रमवारीत महेंद्रसिंह धोनीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवायला हवे, असे मत व्यक्त करून झहीरने भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीचा वाद ऐरणीवर आणला आहे.

‘‘चौथा क्रमांक हा अत्यंत महत्त्वाचा असून त्या क्रमांकावर येऊन परिस्थितीनुसार खेळ करणे अत्यावश्यक असते. अशा परिस्थितीत धोनी ही जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडू शकतो. भविष्यातील विश्वचषकाचा विचार केल्यास धोनीसारखा फलंदाज या जागेसाठी अत्यंत योग्य असल्याचे ,’’ झहीरने म्हटले आहे.

‘‘जेव्हा भारताला चांगला प्रारंभ मिळतो, तेव्हा भारत जिंकतो. मात्र, जेव्हा चांगली सुरुवात मिळत नाही, तेव्हादेखील संघाची कामगिरी उंचवायची असेल तर भारताला फलंदाजीच्या क्रमवारीत बदल आवश्यक असल्याचे मतदेखील झहीरने व्यक्त केले. तसेच इंग्लंडमधील अखेरच्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या लोकेश राहुलला या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर खेळवायला हवा. त्याच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचा संघाला लाभ होईल,’’ असे झहीर  म्हणाला.