बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात कार्तिकने आठ चेंडूत २९ धावांची खेळी साकारत सामन्याचे पारडे बदलून टाकले. त्याच्या या खेळीचे महत्त्व समजून घेण्यासाठी त्याच्या कारकीर्दीवर एक नजर-

महेंद्रसिंग धोनी ज्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो, तिथे मी फक्त एक विद्यार्थी आहे, असे दिनेश कार्तिक अभिमानाने सांगतो. निदाहास चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत बांगलादेशविरुद्ध अनपेक्षित विजयासह विजेतेपद मिळवून देणाऱ्या कार्तिकने ही प्रामाणिकपणे व्यक्त केलेली प्रतिक्रिया विलक्षण बोलकी आहे. कारण धोनीच्या विश्रांतीमुळे कार्तिकला संधी मिळाली आणि त्याने तिचे सोने केल्यानंतर स्वाभाविकपणे तुलनेला प्रारंभ झाला. बांगलादेशविरुद्ध त्याने आठ चेंडूंत २९ धावांची साकारलेली खेळी सध्या क्रिकेटजगतामध्ये चर्चेत आहे. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा आता सुपर ओव्हरमध्ये निर्णय होईल, या कल्पनेने चक्क पॅड बांधायला गेला होता. परंतु कार्तिकने अखेरच्या चेंडूवर अफलातून षटकार खेचत सामन्याचा निकाल लावला.

कार्तिकचे वय ३२ वष्रे. ३ नोव्हेंबर, २००४ मध्ये त्याने कसोटी पदार्पण केले. तर धोनीने २ डिसेंबर, २००५ मध्ये म्हणजे त्याच्यानंतर वर्षभराने कसोटी पदार्पण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र धोनीने मात्र कार्तिकपेक्षा तीन महिने आधी पदार्पण केले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १ डिसेंबर, २००६ या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या दोघांनीही पर्दापण केले होते. म्हणजे या दोघांचीही कारकीर्द तशी एकाच काळात सुरू झाली. परंतु धोनीच्या खात्यावर ९० कसोटी, ३१८ एकदिवसीय आणि ८९ ट्वेन्टी-२० सामने जमा आहेत, तर कार्तिक २३ कसोटी, ७९ एकदिवसीय आणि १८ ट्वेन्टी-२० सामने आतापर्यंत खेळू शकला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाला गवसणी घातली. यापैकी ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघात धोनीचा समावेश होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक विजयवीर फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून ३६ वर्षीय धोनीचे स्थान अबाधित आहे. परंतु कार्तिकचे स्थान अस्थिर आहे. कार्तिक २०१० मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यामुळे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये धोनीने विश्रांती घेतल्यास किंवा फलंदाज म्हणून कार्तिकचा विचार होतो.

विविध वयोगटांच्या क्रिकेटमध्ये आपला प्रभाव दाखवल्यानंतर २००२ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी कार्तिकला तामिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. परंतु सातत्यपूर्ण फलंदाजी करूनही यष्टिरक्षणात समस्या असल्यामुळे त्याला वगळण्यात आले. २००४ मध्ये भारताच्या युवा विश्वचषक संघात त्याने स्थान मिळवले. या कामगिरीच्या बळावर तो पुन्हा बहरला. मग २००४ मध्ये भारताच्या वरिष्ठ संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. मग कार्तिकला कसोटी क्रिकेटमध्ये नियमित यष्टिरक्षक होता आले. परंतु कोणत्याही सामन्यांत धावांची सरासरी वीसहून अधिक उंचावू न शकल्यामुळे त्याची जागा धोनीने घेतली. त्यानंतर आलेल्या अस्थर्याचा आजही कार्तिक सामना करीत आहे. हे अस्थैर्य फक्त व्यावसायिक पातळीवरचेच नव्हते तर वैयक्तिक आयुष्यातही होते.

वेदनागृहाने आयुष्य बदलले!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी धडपडत असताना कार्तिक स्थानिक क्रिकेटमध्ये मात्र सातत्याने धावा करीत होता. २०१६ च्या आयपीएलला सामोरे जाण्यापूर्वी कार्तिकने आपल्या कारकीर्दीचा शांतपणे नव्याने विचार केला. काही तरी चुकतेय आणि कुठेतरी सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे, त्याला उमजले. मैदानावर फलंदाजीचे तंत्र सुधारण्याची आणि मानसिक दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे, हे कळल्यानंतर कार्तिकने त्याची शोधण्याची जबाबदारी मुंबईचा रणजीपटू अभिषेक नायरकडे दिली.

कार्तिक मुंबईत आला, तेव्हा त्याच्या नेहमीच्या सुखवस्तू जीवनशैलीपासून नायरने त्याला दूर नेले. मुंबईत एका छोटय़ाशा घरात नायरने कार्तिकला निवासाला ठेवले. ‘हाऊस ऑफ पेन’ म्हणजेच ‘वेदनागृह’ अशा प्रकारे या घराची रचना करण्यात आली होती. जगातील वास्तववादी वेदना कार्तिकला देण्याचा मुळीच उद्देश येथे नव्हता. फक्त नेहमीच्या आरामदायी जीवनशैलीपासून दूर नेण्यासाठी ही रचना करण्यात आली होती. हे घर अगदी लहान होते. या घरातील शॉवर क्वचितच चालायचा. चहाचा मग आणि बादली मोडलेल्या अवस्थेत होती. मात्र हे सारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कार्तिकची होती. चेन्नईत बंगल्यामध्ये राहणाऱ्या कार्तिकला सुरुवातीच्या दिवसांत हे कठीण गेले. संतापाने तो लालबुंद व्हायचा. एके रात्री संतापाच्या भरात त्याने नायरला फोन केला आणि एक रात्र तरी हॉटेलमध्ये राहू दे, अशा शब्दांत गयावया करू लागला. कार्तिकला स्वत:च्या आत्मविश्वासाविषयी साशंका होती. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला स्थिरावता आले नव्हते. अगदी आयपीएलच्या लिलावातही त्याचा भाव नऊ कोटी रुपयांवरून दोन कोटी रुपयांपर्यंत घसरला होता.

नायरने मुंबईचे प्रशिक्षक अपूर्व देसाई यांना मदतीला घेतले आणि क्रिकेटचा दैनंदिन कार्यक्रम ठरवला. मुंबईचा माजी सलामीवीर अमित पागनीसच्या काही विशिष्ट सत्रांचाही यात समावेश होता. कार्तिकच्या पदलालित्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी नायरने आणखी काही विशेषज्ञसुद्धा नियुक्त केले. क्रिकेटचा सराव, जिम, काही प्रमाणात चिंतन आदी गोष्टींचा यात समावेश होता. नायरने अशाच प्रकारचा प्रयोग चार वर्षांपूर्वी रोहित शर्मावर केला होता.

नायरच्या या प्रयोगाचा निकाल पुढील वर्षी स्थानिक हंगामात दिसून आला. कार्तिकने १४ सामन्यांत ५० हून अधिक धावसरासरीने एकूण ७०४ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नऊ सामन्यांत ११८ च्या सरासरीने ६०७ धावा केल्या. यात दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. त्यानंतर २०१७ चा आयपीएलचा हंगाम संपला, तेव्हा कार्तिकला स्वत:चे स्थान पुन्हा मिळाले होते. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी कार्तिकची निवड झाली होती. आता कार्तिकच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांबाबत नायरचे मार्गदर्शन असते. त्यामुळेच निदाहास चषक स्पध्रेतील कार्तिकच्या यशानंतर त्याचा मार्गदर्शक नायर प्रकाशात आला.

आयुष्यातील वादळ

दिनेश कार्तिक आणि भारताचा कसोटी सलामीवीर मुरली विजय हे जीवाभावाचे मित्र होते. मात्र प्रेमाच्या त्रिकोणामुळे त्यांच्यातील मैत्री संपुष्टात आली. २०१२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या पाचव्या हंगामाच्या वेळी पत्नी निकिताचे विजयसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचे कार्तिकला लक्षात आले. त्यामुळे  त्याला तीव्र धक्का बसला. कार्तिकने तिच्याशी घटस्फोट घेतला. कालांतराने निकीताने विजयशी विवाह केला.

कार्तिक आणि निकीताच्या प्रेमप्रकरणाला २००७ मध्ये प्रारंभ झाला. कार्तिक २१ वर्षांचा असताना त्याने आपली बालपणीची मैत्रीण निकीता वंजाराशी विवाह केला. दोघांच्याही वडिलांमध्ये घनिष्ठ मैत्री असल्यामुळे या मैत्रीचे नात्यामध्ये रूपांतर करण्यात कोणीही आडकाठी आणली नाही. पाच वर्षांच्या यशस्वी संसारानंतर निकीताला विजय आवडू लागला. पण हे प्रकरण २०१२ च्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पध्रेदरम्यान उजेडात आल्यानंतर कार्तिकने तिच्याशी काडीमोड घेतला.

त्यानंतर दीपिका पल्लीकल ही भारताची आंतरराष्ट्रीय स्क्वॉशपटू कार्तिकच्या जीवनात आली. ऑगस्ट २०१५ मध्ये कार्तिकने दीपिकाशी विवाह केला. २०१३ मध्ये या दोघांची एका मॅरेथॉन स्पध्रेच्या वेळी भेट झाली. त्यानंतर आपण एकाच जिमला जातो, असे दोघांच्या लक्षात आले. बसू शंकर यांच्या जिममध्ये कार्तिक आणि दीपिकाची मैत्री फुलली. मग एकमेकांच्या सामन्यांना ते हजेरी लावू लागले. अगदी आयपीएल सामन्यांनाही दीपिका जाऊ लागली. २०१३ च्या आयसीसी चॅम्पियन्सक करंडक विजेत्या भारतीय संघाचा कार्तिक भाग होता. या ठिकाणीसुद्धा दीपिका उपस्थित होती. तिला क्रिकेट आवडायचे नाही. देशातील अन्य खेळांचा विकास क्रिकेटमुळे रोडावला आहे, अशी तिची धारणा होती. कार्तिक आयुष्यात आल्यानंतर मात्र तिला क्रिकेटसुद्धा आवडू लागले. आता ही दोघेही संसार आणि व्यावसायिक कारकीर्दीचा समतोल साधत नांदत आहेत.
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा