रिओ ऑलिम्पिकमध्ये कलात्मक जिम्नॅस्टिक खेळात भारताकडून आतापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी नोंदविल्याबद्दल त्रिपुरास्थित जिम्नॅस्टिकपटू दिपा करमाकरला सचिनच्या हस्ते देण्यात आलेली बिएमडब्ल्यू ही आलिशान गाडी ती परत करणार असल्याचे समजते. रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानापर्यंत मजल मारणाऱ्या दिपाचे कांस्य पदक थोडक्यात हुकले. क्रिकेट खेळाचे वर्चस्व असलेल्या देशात त्रिपुरामधील आगरताळासारख्या छोट्या शहरातून आलेल्या दिपाने सुरुवातीच्या काळात स्कूटर सीटचा वापर करत जिन्मास्टिकमधील कौशल्य आत्मसात करण्यास सुरुवात केली होती. देशात जिम्नॅस्टिक खेळासाठी चांगले वातावरण निर्माण करणाऱ्या दिपाला आणि तिच्या कुटुंबियांना या महागड्या गाडीचा देखभाल खर्च न परवडणारा आहे. तसेच अगरताळामधील छोट्या आणि खराब रस्त्यावरून ही आलिशान गाडी चालविणे जिकरीचे आहे. त्यामुळे ही गाडी परत करण्याचा निर्णय दिपाने आणि तिच्या कुटुंबियांनी घेतला असल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, महागड्या गाडीच्या देखभालीची चिंता न करता महिन्याभराने जर्मनी येथे होणाऱ्या ‘चॅलेंजर्स कप’वर लक्षकेंद्रीत करण्याचा सल्ला दिपाला देण्यात आला आहे. ‘बीएमडब्ल्यू’ परत करण्याच्या निर्णयाविषयी बोलताना दिपाचे प्रशिक्षक नंदी म्हणाले की, हा केवळ दिपाचा एकटीचा निर्णय नसुन तिचे कुटुंबीय आणि मी आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. शहरात ‘बीएमडब्ल्यू’चे देखभाल केंद्र उपलब्ध नसून, येथील रस्ते अशाप्रकारच्या गाडीसाठी योग्य नाहीत. याबाबत आम्ही हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनशी संवाद साधला असून त्यांनी आमची विनंती स्विकारली आहे. गाडीच्या किंमती इतकी रक्कम दिपाच्या खात्यात जमा करण्याची विनंती त्यांना केली आहे.

जर्मनीमध्ये होणाऱ्या ‘चॅलेंजर्स कप’मध्ये दिपाचा सहभाग होणे हे यामागचे महत्वाचे कारण असल्याचे बोलले जाते. चॅलेंजर्स कपमध्ये सहभागी होण्यासाठी कमीतकमी तीन जणांचा संघ पाठविण्याचे फेडरेशेनकडून सांगण्यात आल्याची माहिती प्रशिक्षक नंदीनी दिली. अश्मिता पॉलचा संघात समावेश होऊ शकतो आशी आशा व्यक्त करणाऱ्या नंदी यांनी दिपाच्या सहभागाविषयी शाश्वती दर्शवली नाही. दिपाने अद्याप सरावास सुरुवात केली नसल्याचे समजते.