जागतिक कुस्ती स्पर्धा

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील भारताच्या अभियानाला शनिवारी निराशाजनक प्रारंभ झाला. ग्रीको-रोमन प्रकारात सहभागी झालेल्या भारताच्या चारपैकी एकाही कुस्तीपटूला पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही.

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता हरप्रीत सिंग (८२ किलो), सागर (६३ किलो) आणि मनजीत (५५ किलो) यांना आपापल्या लढतीत एकाही गुणाची कमाई करता आली नाही. योगेश (७२ किलो) याने अमेरिकेच्या रेमंड अँथनी बंकर याच्याविरुद्ध कडवा प्रतिकार केला, पण त्याला ५-६ अशा फरकाने पराभूत व्हावे लागेल.

८२ किलो गटात हरप्रीतला चेक प्रजासत्ताकच्या पीटर नोव्हाककडून०-७ असे पराभूत व्हावे लागले. मनजीत याला अझरबैजानच्या इल्डनिझ अझिझली याच्याकडून ०-८ अशी हार पत्करावी लागली. ६३ किलो गटात सागरला कझाकस्तानच्या अल्मात केबिस्पायेव्ह याच्याकडून तांत्रिक गुणांच्या आधारावर ०-८ असे पराभूत व्हावे लागले.