दोन सेट गमावल्यानंतर सलग १३ गेम जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

एपी, पॅरिस

जागतिक टेनिस क्रमवारीत आपण अग्रस्थानी का विराजमान आहोत, हे सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी पुन्हा सिद्ध केले. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत दोन सेट गमावूनही मानसिकदृष्टय़ा कधीच हार न मानणाऱ्या जोकोव्हिचने सलग १३ गेम जिंकून झोकात पुनरागमन केले. पाचव्या सेटमध्येही आघाडीवर असताना अखेर प्रतिस्पध्र्यानेच दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे जोकोव्हिचच्या १५व्या फ्रेंच उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

अग्रमानांकित जोकोव्हिच इटलीच्या १९ वर्षीय लोरेंझो मुसेटीविरुद्ध ६-७ (७-९), ६-७ (२-७), ६-१, ६-०, ४-० असा आघाडीवर होता. मात्र स्नायूंच्या दुखापतीमुळे मुसेटीला माघार घ्यावी लागल्याने जोकोव्हिचला पुढे चाल देण्यात आली. उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचची मॅटिओ बॅरेट्टिनीशी गाठ पडेल.

पुरुष एकेरीच्या अन्य लढतींमध्ये अर्जेटिनाच्या १०व्या मानांकित दिएगो श्वाट्र्झमनने जर्मनीच्या लेनार्ड स्टर्फवर ७-६ (११-९), ६-४, ७-५ अशी मात केली. स्पेनच्या गतविजेत्या राफेल नदालने जॅनिक सिनरवर ७-५, ६-३, ६-० असे वर्चस्व गाजवले. त्यापूर्वी, रविवारी मध्यरात्री जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने जपानच्या अनुभवी केई निशिकोरीला ६-४, ६-१, ६-१ अशी सहज धूळ चारली.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा

गॉफचा पराक्रम, केनिन पराभूत

महिला एकेरीत अमेरिकेची १७ वर्षीय कोको गॉफ, चेक प्रजासत्ताकची बाबरेरा क्रेजिकोव्हा यांनी प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. २४व्या मानांकित गॉफने टय़ुनिशियाच्या २५व्या मानांकित ओन्स जबेऊरचा ६-३, ६-१ असा धुव्वा उडवला. बिगरमानांकित क्रेजिकोव्हाने अमेरिकेच्या स्लोन स्टीफन्सचा ६-२, ६-० असा फडशा पाडला. ग्रीकच्या १७व्या मानांकिता मारिया सकारीने चौथ्या मानांकित सोफिया केनिनवर ६-१, ६-३ असे वर्चस्व गाजवून तिचे आव्हान संपुष्टात आणले.

जोकोव्हिचने यंदाच्या वर्षांतील ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये सलग ११ सामने जिंकले असून दोन वर्षांनी प्रथमच त्याला ग्रँडस्लॅम स्पर्धेत पाचव्या सेटपर्यंत झुंज द्यावी लागली.

बोपण्णाचे आव्हान संपुष्टात

रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियन सहकारी फ्रँको स्कूगोर यांना सोमवारी पुरुष दुहेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पाब्लो अँडुआर आणि प्रेडो मार्टिनेझ या स्पेनच्या जोडीने बोपण्णा-स्कूगोरला ७-५, ६-३ असे नमवून उपांत्य फेरी गाठली.