जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला राडेक स्टेपानेककडून कडवा संघर्ष सहन करावा लागला तरी जोकोव्हिचने तीन सेटमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मजल मारली. महिलांमध्ये, द्वितीय मानांकित मारिया शारापोव्हा, पोलंडची अग्निस्झेका रॅडवान्स्का, सर्बियाची अ‍ॅना इव्हानोव्हिच यांनी आगेकूच केली असली तरी अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचे आव्हान संपुष्टात आले.
जोकोव्हिचला चेक प्रजासत्ताकच्या स्टेपानेकचे आव्हान ६-४, ६-३, ७-५ असे परतवून लावताना बराच घाम गाळावा लागला. स्टेपानेकने जोरदार फटके लगावून जोकोव्हिचला गुणांसाठी झुंजवले, मात्र कोर्टवरील कौशल्य, सहज वावर आणि परतीचे सुरेख फटके लगावून जोकोव्हिचने आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारली. अव्वल मानांकित जोकोव्हिचला आता सलग तिसरे ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे जेतेपद खुणावत आहे. त्याला चौथ्या फेरीत स्वित्र्झलडच्या स्टॅनिस्लॉस वावरिन्काशी लढत द्यावी लागेल. वावरिन्काने अमेरिकेच्या सॅम क्वेरीचा ७-६ (८/६), ७-५, ६-४ असा पाडाव केला.
अ‍ॅना इव्हानोविच हिने जेलेना जान्कोविच हिचा ७-५, ६-३ असा पाडाव करत विजयी घोडदौड कायम राखली. तिची पुढील फेरीत रॅडवान्स्का हिच्याशी गाठ पडेल. चौथ्या मानांकित रॅडवान्स्काने ब्रिटनच्या हीदर वॉटसन हिचा ६-३, ६-१ असा धुव्वा उडवला.  दुसऱ्या मानांकित रशियाच्या मारिया शारापोव्हा हिने सात वेळा ग्रँड स्लॅम जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या व्हीनस विल्यम्सचे आव्हान संपुष्टात आणले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या शारापोव्हाने ७९ मिनिटांत व्हीनसवर ६-१, ६-३ अशी सहज मात केली.
 शारापोव्हाला चौथ्या फेरीत बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेन्स हिचा सामना करावा लागेल. फ्लिपकेन्स हिने रशियाच्या व्हॅलेरिया सॅव्हिंख हिच्यावर ६-२, ४-६, ६-३ असा विजय प्राप्त केला. चीनची अव्वल खेळाडू ली ना हिने रोमानियाच्या सोराना ख्रिस्तिया हिचा पराभव करून चौथ्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. सहाव्या मानांकित ली ना हिने ६-४, ६-१ असा विजय मिळवला.
पुरुषांच्या तिसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डिचने ऑस्ट्रियाच्या जर्गन मेल्झर याला ६-३, ६-२, ६-२ असे सहज नमवले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या उत्कंठावर्धक सामन्यात रशियाच्या केव्हिन अँडरसनने स्पेनच्या फर्नाडो वेर्डास्को याचे आव्हान ४-६, ६-३, ४-६, ७-६ (७/४), ६-२ असे परतवून लावले. आता बर्डिच आणि अँडरसन यांच्यात चौथ्या फेरीची लढत होईल.     

सानिया मिर्झा-बॉब ब्रायनची आगेकूच
मेलबर्न : भारताच्या सानिया मिर्झा हिने अमेरिकेचा दुहेरीतील अव्वल दर्जाचा खेळाडू बॉब ब्रायन याच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्रदुहेरीत झकास सुरुवात केली. त्यांनी समंथा स्टोसूर व ल्युक सॅव्हेली या स्थानिक जोडीवर ६-२, ६-२ असा दणदणीत विजय मिळविला. मिर्झा व ब्रायन यांनी केवळ ५० मिनिटांमध्ये विजय मिळविला. सानिया व डावखुरा खेळाडू ब्रायन यांनी पहिल्या सेटमध्ये मिळालेल्या तीनही ब्रेकपॉईन्टचा उपयोग केला. दुसऱ्या सेटमध्येही त्यांनी दोन ब्रेक पॉईन्टचा उपयोग केला. त्यांनी परतीच्या खणखणीत फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच त्यांनी नेटजवळून प्लेसिंगचा बहारदार खेळ केला.