विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दुसऱया सत्राचा शेवट एका हास्यास्पद प्रसंगाने झाला. मैदानात अचानक एका श्वानाने घुसखोरी केल्याने खेळात व्यत्यत आला. श्वानाच्या मुक्त संचारामुळे सामना सुरू करण्यात अडचण निर्माण झाली होती. सामन्याच्या ५७ व्या षटकात हा प्रसंग घडला.

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा

स्टुअर्ट ब्रॉड आपल्या षटकाचा तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार असताना मैदानात एका श्वानाचे आगमन झाले. चेतेश्वर पुजारा ९७ धावांवर खेळत असल्याने त्याच्या शतकाची उत्सुकता सर्व चाहत्यांना होती. पण ब्रॉडच्या षटकामध्येत श्वानाने मैदानात एण्ट्री घेतल्याने खेळात व्यत्यय आला. श्वानाने मैदानातून बाहेर जाण्यासाठी अगदी स्टुअर्ट ब्रॉडने देखील त्याला हटकण्याचा प्रयत्न केला, पण श्वान महाराज काही ऐकेनात. अखेर स्टेडियमचे दोन कर्मचारी श्वानाच्या मागे धावू लागले. त्यानंतर श्वानाने सीमारेषेबाहेर पलायन केले.

cxc-g0kuqaari-o

खेळाला पुन्हा सुरूवात होणार इतक्यात दुसऱया बाजूने त्याच श्वानाने पुन्हा मैदानात हजेरी लावली आणि संपूर्ण स्टेडियमवर हशा पिकला. काहींनी तर हा प्रसंग आपल्या मोबाईल कॅमेरात टीपण्यासही सुरूवात केली. श्वानाच्या या अडथळ्यामुळे अखेर पंचांनी दुसऱया सत्राचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुजारा आणि कोहलीची शतक पाहण्यासाठी चाहत्यांना तिसऱया सत्राची वाट पाहावी लागणार आहे. दुसऱया सत्राच्या अखेरीस भारताची धावसंख्या २ बाद २१० धावा अशी झाली असून पुजारा आणि कोहली यांनी १८८ धावांची भागीदारी रचली आहे. पुजारा ९७ तर, कोहली ९१ धावांवर खेळत आहे.