सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. भारतात अद्याप कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु झालेल्या नाहीत. परंतू खेळाविषयी भारतीय लोकं फारसे जागरुक नसल्याचं वक्तव्य देशाचे क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी केलं. इतकच नव्हे तर संसदेत आपल्या सहकाऱ्यांनाही खेळाविषयी फार कमी ज्ञान असल्याचं रिजीजूंनी सांगितलं.

“भारतीय समाजात खेळाविषयी खूप कमी ज्ञान आहे. मला कोणाचाही अपमान करायचा नाही, पण संसदेत माझ्या सहकाऱ्यांनाही याविषयी फार कमी माहिती आहे. प्रत्येकाला क्रिकेटविषयी माहिती आहे, इंग्रजांनी हा खेळ आपल्या मनात भरवला आहे. समोरच्या संघाला हरवायचं यापलीकडे आपल्याला फारसं काही समजतं नाही. फारशी काहीही माहिती नसताना प्रत्येकाला सुवर्णपदकाची आशा असते.” रिजीजू ELMS Sports Foundation आणि Abhinav Bindra Foundation तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

काही दिवसांपूर्वी हरियाणा ते बिहार सायकल प्रवास करणारी ज्योती कुमारी, कंबाला जॉकी श्रीनीवास गौडा, रामेश्वर गुर्जर हे सोशल मीडियावर हीट झाले होते. माझ्या काही सहकाऱ्यांना सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारी मंडळी देशासाठी ऑलिम्पिकचे दावेदार असल्याचं वाटतं…आणि याचं मला खरंच आश्चर्य वाटतं असं रिजीजू म्हणाले. कर्नाटकात बैलांसोबत शर्यतीत पळणाऱ्या श्रीनीवास गौडाने १०० मी. अंतर अवघ्या काही सेकंदात पार करून बोल्टचा विक्रम मोडला होता. यानंतर श्रीनीवासला भारताचा बोल्ट अशी पदवी सोशल मीडियावर देण्यात आली होती.

ज्योती कुमारीबद्दल बोलत असताना रिजीजू म्हणाले, “लॉकडाउन काळात ज्योतीला आपल्या वडिलांना सायकलवर बसवून घरी आणावं लागलं…खूप खडतर परिस्थितीवर मात करुन तिने हरियाणा ते बिहार असा प्रवास केला. पण यानंतर काही जणांना ती भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवेल असं वाटलं. पण सायकलिंग या खेळात काय प्रकारची मेहनत असते आणि कसा सराव करावा लागतो याची माहिती नसताना लोकं फक्त सुवर्णपदकाची आशा धरतात.” बैलांसोबत शर्यतीत धावणाऱ्या श्रीनीवासलाही सोशल मीडियाने असंच उचलून धरलं…चांगल्या लोकांनी संधी दिली जात नाही असं वाटायला नको म्हणून आम्हीली त्याला ट्रायलसाठी बोलावलं. पण आंतरराष्ट्रीय धावपटू होण्यासाठी तो योग्य नसल्याचं मला सांगण्यात आलं. त्यामुळे योग्य लोकांना संधी देण्यासोबतच देशात खेळाविषयी ज्ञान वाढणं गरजेचं असल्याचं रिजीजूंनी सांगितलं.