करोनाच्या भीतीमुळे जून-जुलै महिन्यात होणारी विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लांबणीवर टाकायची की रद्द करायची, याचा निर्णय घेण्यासाठी ऑल इंग्लंड क्लबने पुढील आठवडय़ात तातडीची बैठक बोलावली आहे.

१८७७ पासून सुरू झालेली विम्बल्डन स्पर्धा फक्त दोन महायुद्धांमुळे थांबवण्यात आली होती.  करोनामुळे जागतिक क्रीडा वेळापत्रक बिघडले असताना मे महिन्यात लालमातीवर होणारी फ्रेंच खुली स्पर्धा आता २० सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र नैसर्गिक हिरवळीवर खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धाचा मोसम हा फक्त पाच आठवडे असतो. त्यामुळे विम्बल्डन स्पर्धा कधी घ्यायची किंवा रद्द करायची, याचा निर्णय आता संयोजकांना घ्यावा लागणार आहे.