गुणलेखनाच्या नव्या पद्धतीमुळे आयबीएल ही अनोखी स्पर्धा असेल. स्पर्धेचे स्वरूप वेगळे आहे, या प्रकारात कोणीही जिंकू शकते. आमच्याकडे चांगला संघ आहे. या स्वरुपानुसार आम्ही सोमवारी सराव केला. खेळाचा कालावधी जितका छोटा तितका खेळाचा वेग वाढतो. त्यामुळे आक्रमक आणि वेगवान बॅडमिंटन पाहायला मिळेल, असे मत ज्वाला गट्टाने प्रकट केले.
नवीन पद्धतीनुसार पहिल्या आणि दुसऱ्या गेममध्ये सात आणि चौदाव्या गुणानंतर साठ सेकंदांचा विश्रांती टप्पा असेल. सामना तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये गेल्यास सहाव्या गुणानंतर विश्रांती कालावधी मिळेल. पहिल्या आणि दुसऱ्या गेममध्ये २०-२० अशा बरोबरीनंतर विजय मिळवण्यासाठी दोन गुणांचा फरक असणे आवश्यक ठरणार नाही. तिसरा आणि निर्णायक गेम २१ ऐवजी ११ गुणांचा असणार आहे. जो खेळाडू सर्वप्रथम ११ गुण मिळवेल, त्याला विजयी घोषित केले जाईल.
‘‘इंडियन बॅडमिंटन लीगद्वारे स्पर्धात्मक बॅडमिंटनकडे परतेन. आयबीएलपूर्वीच्या स्पर्धामध्ये मी फार अपेक्षांसह सहभागी झाले नव्हते. या स्पर्धेत स्वत:कडूनच मला खूप अपेक्षा आहेत. मी अतिशय तंदुरुस्त आहे. ऑलिम्पिकपूर्वी जेवढी तंदुरुस्त आहे, त्यापेक्षा अधिक चांगले वाटत आहे. थोडेसे दडपण जाणवते आहे, कारण इथे जोरदार मुकाबला असणार आहे. एका अर्थाने माझ्यासाठी हे पुनरागमन असणार आहे,’’ असे ज्वालाने सांगितले. आयबीएलच्या पाश्र्वभूमीवर क्रिश दिल्ली स्मॅशर्स संघाच्या सरावानंतर ती बोलत होती.
‘‘एप्रिलमध्ये सरावाला सुरुवात केल्यानंतर मी १२ किलो वजन घटवले आहे. माझ्या आहारावर कठोर र्निबध आहेत. दुखापतग्रस्त होऊ नये यासाठी मी पुरेशी काळजी घेत आहे. या सर्व गोष्टींमुळे मला तंदुरुस्त वाटत आहे,’’ असे तिने पुढे सांगितले.