साऊदम्पटन कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर यजमान इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगलं पुनरागमन केलं. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन केलं. मँचेस्टर कसोटीत नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या खेळातले काही तास पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेले. पण दिवसाअखेरीस इंग्लंडने ३ गड्यांच्या मोबदल्यात २०७ धावांपर्यंत मजल मारली.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने संघात भरघोस बदल केले. कर्णधार जो रुटच्या पुनरागममासोबत स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांना संघात स्थान देण्यात आलं. Bio Security नियमांचा भंग केल्याप्रकरणी जोफ्रा आर्चरने दुसऱ्या कसोटीसाठी संघातलं स्थान गमावलं. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर यजमनांनी सावध खेळ करणं पसंत केलं. पहिल्या कसोटीत दाणादाण उडवणाऱ्या होल्डर आणि गॅब्रिअल यांचाही इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगला सामना केला. यावेळी विंडीजचा कर्णधार होल्डरने फिरकीपटू रोस्टन चेसला संधी दिली.

अवश्य पाहा – संघातलं स्थान गमवावं लागण्याइतपत जोफ्रा आर्चरने केलं तरी काय??

रोस्टन चेसनेही मिळालेल्या संधीचं सोनं करत इंग्लंडची जोडी फोडली. रोरी बर्न्स आणि झॅक क्रॉली यांना लागोपाठ बाद केल्यानंतर चेसकडे हॅटट्रीकची संधी होती, परंतू कर्णधार जो रुटने त्याची ही संधी हुकवली. कर्णधार जो रुट केळपट्टीवर जम बसवतोय असं पाहताच होल्डरने अल्झारी जोसेफला गोलंदाजी देत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. २३ धावा काढून रुट माघारी परतला.रोस्टन चेस आणि अल्झारी जोसेफने १०० धावांच्या आत इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडत विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र यानंतर सलामीवीर डोम सिबले आणि मधल्या फळीत बेन स्टोक्सने यांनी विंडीजच्या गोलंदाजांचा सुरेख सामाना करत संघाला द्विशतकी मजल मारुन दिली.

सिबले आणि स्टोक्स या दोन्ही फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांना नेटाने सामना केला. खराब चेंडूवर फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी आपलं अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिबले नाबाद ८६ तर स्टोक्स नाबाद ५९ धावांवर खेळत होता. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा संघ किती धावांपर्यंत मजल मारतो आणि विंडीजचे गोलंदाज काय रणनिती आखून मैदानात उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.