वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडच्या संघाला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी स्टोक्स आणि सिबलेच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या खेळात ४६९ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने विंडीजची अवस्था १ बाद ३२ अशी केली होती. तिसऱ्या दिवशी विंडीजला झटपट गुंडाळण्याच्या तयारीत असलेल्या इंग्लंडच्या गोलंदाजांचा हिरमोड झाला. पावसाच्या संततधारेमुळे पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला. दिवसभर मँचेस्टरमध्ये पावसाने उसंत घेतली नव्हती, त्यामुळे पंचांनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.

यजमान इंग्लंड संघ या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. ४६९ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर इंग्लंडकडे हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती. परंतु पावसाने या सर्व मनसुब्यांवर पाणी फिरवलं आहे. दुसरीकडे विंडीजच्या खेळाडूंना ही कसोटी अनिर्णित राखण्याची संधी आहे. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळात वरुणराजा व्यत्यय आणतो की खेळाडू मैदानात उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.