भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यातील पहिली कसोटी १ ऑगस्टपासून सुरु झाली असून आज या कसोटीचा दुसरा दिवस आहे. या दिवसाची सुरुवात इंग्लंडची फारशी चांगली ठरली नाही. पहिल्या दिवसअखेर ९ बाद २८५ धावांवर खेळ थांबवण्यात आला होता. त्यांनतर दुसऱ्या दिवशी केवळ २ धावांची भर घालत इंग्लंडचा संघ तंबूत परतला. या सामन्यात अश्विनने अप्रतिम गोलंदाजी करत ४ बळी टिपले तर मोहम्मद शमीने ३ गडी बाद केले.

पहिल्या डावात कर्णधार रूटने इंग्लंडतर्फे सर्वाधिक ८० धावा केल्या. या सामन्यात रूटसह बटलरकडूनही इंग्लंडला अपेक्षा होत्या. पण बटलरला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे पहिला दिवस त्याच्यासाठी काहीसा निराशाजनक ठरला. पण त्या पाठोपाठ आज दुसऱ्या दिवशीही त्याला त्रासाला सामोरे जावे लागले. कोहलीच्या फलंदाजीच्या वेळी बटलर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी बटलरने कोहलीचा झेल घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी त्याचा हातून झेल तर सुटलाच पण त्याच्या बोटाला दुखापत झाली.

या दुखापतीमुळे बटलरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्या बोटाचा एक्स-रे काढण्यात येणार आहे, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. ही दुखापत किती गंभीर आहे, ते अद्याप समजू शकलेले नाही. पण या दुखापतीमुळे कदाचित बटलरला या मालिकेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.