पहिला वन-डे सामना जिंकून मालिकेची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याच सामन्यात निराशा केली आहे. इंग्लंडला २३१ धावांवर रोखल्यानंतर चांगली सुरुवात केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि यजमान इंग्लंडने २४ धावांनी सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. विजयासाठी २३२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांच्या भेदक माऱ्यासमोर २०७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो हे स्वस्तात माघारी परतले. जेसन रॉय २१ धावा काढून माघारी परतला तर बेअरस्टोला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर जो रुट आणि कर्णधार मॉर्गन यांनी पुन्हा एकदा छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू यावेळी रुटने केलेली संथ खेळी इंग्लंडला चांगलीच मारक ठरली. ७३ चेंडूत रुटने ४ चौकार आणि एका षटकारासर ३९ धावा केल्या. झॅम्पाने रुटला माघारी धाडत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीने पुन्हा एकदा निराशा केली. अखेरच्या फळीत टॉम करन आणि आदिल रशिद यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने २३१ धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाकडून झॅम्पाने ३, मिचेल स्टार्कने २ तर हेजलवूड-कमिन्स आणि मार्श या त्रिकुटाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली होती. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला स्टॉयनिस झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार फिंच आणि लाबुशेन यांनी भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. फिंचने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. लाबुशेनसोबत भागीदारीदरम्यान फिंचने आपलं अर्धशतकही साजरं केलं. १४४/२ अशी धावसंख्या असताना ख्रिस वोक्सने लाबुशेनला माघारी धाडलं. अवघ्या २ धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं. यानंतर मधल्या फळीत कॅरीचा अपवाद वगळता एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज तग धरु शकला नाही. फिंचही कालांतराने ७३ धावा काढून माघारी परतला. जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. १० षटकांत २ षटकं निर्धाव टाकून ३४ धावा देत ३ बळी घेणाऱ्या आर्चरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.