३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी इंग्लंडच्या खेळपट्टीवर झालेल्या इंग्लंड – पाकिस्तान एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने पाकचा ४-० असा धुव्वा उडवला. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर पुढील चारही सामने जिंकून इंग्लंडने मालिकेत निर्भेळ यश मिळवले. पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात पाकिस्तानकडून संघर्षाची अपेक्षा होती. मात्र, इंग्लंडने त्यांना फारशी चमक दाखवण्याची संधी दिली नाही. इंग्लंडच्या ९ बाद ३५१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ २९७ धावांत माघारी परतला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला जेम्स व्हिन्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी झकास सुरुवात करून दिली. या दोघांनी ६३ धावांची भागीदारी केली. पण शाहीन आफ्रिदीने ही जोडी फोडली. त्याने व्हिन्सला (३३) बाद केले. त्या पाठोपाठ इमाद वासीमने बेअरस्टो (३२) ला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जो रूट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी इंग्लंडचा डाव सावरला. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करून दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११७ धावा केल्या. पण, आफ्रिदीने इंग्लंडच्या कर्णधारालाही बाद केले. मॉर्गनने ६४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ७६ धावा करून माघारी परतला. त्यानंतर रूटने ८४ आणि जोस बटलर (३४) व टॉम करन (२९*) यांनी इंग्लंडला ९ बाद ३५१ धावांचा पल्ला गाठून दिला.

या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने ६ धावांत पहिले ३ गडी गमावले. ख्रिस वोक्सने भेदक मारा करत पाकला हादरे दिले. पण बाबर आझम आणि सर्फराज अहमद यांनी १४६ धावांची भागीदारी करून डावाला आकार दिला. मोठ्या भागीदारीकडे जातानाच बाबर आझम ८० धावांवर बाद झाला. त्यानंतर २७ व्या षटकात आदिल रशीदच्या गोलंदाजीवर सर्फराज बाद झाला. सर्फराजही ९७ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर सामना पुन्हा एकदा इंग्लंडच्या पकडीत आला आणि इंग्लंडने ती संधी दवडली नाही. इंग्लंडने हा सामना ५४ धावांनी जिंकला.